
एसएससीतर्फे दिल्ली पोलीस आणि सीएपीएफमध्ये सब-इन्स्पेक्टर पदांसाठी १८७१ जागांची मेगाभरती जाहीर झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ११ सप्टेंबर : देशातील सुरक्षा दलांमध्ये अधिकारी होण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेस (CAPF) मध्ये सब-इन्स्पेक्टर (उपनिरीक्षक) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे तब्बल १,८७१ संभाव्य पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलात भरतीची संधी
या भरती प्रक्रियेत दिल्ली पोलीस (पुरुष व महिला), बीएसएफ (BSF), सीआरपीएफ (CRPF), सीआयएसएफ (CISF), आयटीबीपी (ITBP) आणि एसएसबी (SSB) या दलांमधील उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे. एकूण १८७१ जागांपैकी दिल्ली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ३१७ जागा, सीएपीएफ जीडी उपनिरीक्षक पदासाठी १,३२० जागा आणि सीआयएसएफ फायर विभागासाठी २३४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल-६ नुसार (३५,४०० ते १,१२,४०० रुपये) वेतनश्रेणी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता अन् वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्याधेत सवलत दिली जाईल. दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणीच्या वेळी वैध हलके वाहन (LMV) चालक परवाना असणे बंधनकारक आहे.
३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत
पात्र उमेदवारांना एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवरून (ssc.gov.in) किंवा मोबाईल ॲपद्वारे ३० सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबर आहे, तर अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान विंडो उघडी राहील. निवड प्रक्रियेत संगणकावर आधारित लेखी परीक्षा (Paper-I), शारीरिक पात्रता चाचणी (PET/PST), पेपर-२ आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश असणार आहे.