मंत्रालयातील ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांचा प्रशासनाला मोठा दणका

मंत्रालयात नियमांचे उल्लंघन करून प्रतिनियुक्तीवर आलेल्या ५७० कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मूळ विभागात रवानगी करण्यात आली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. ११ सप्टेंबर : मंत्रालयातील विविध मंत्री कार्यालये आणि शासकीय विभागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने ठाण मांडून बसलेल्या ५७० हून अधिक कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाने प्रतिनियुक्ती, बाह्यस्रोत आणि तोंडी आदेशांवर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ विभागात परत पाठवले आहे. या धडक कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नियमबाह्य आणि तोंडी आदेशांवरील नियुक्त्या रद्द

मंत्रालयात विहित प्रक्रियेचा अवलंब न करता, मुख्य सचिवांची अथवा संबंधित विभागांची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर प्रतिनियुक्ती आणि तोंडी आदेशांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, अभियंता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकारामुळे मूळ विभागातील कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याच्या आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर प्रशासनाने ही कडक भूमिका घेतली आहे.

१० सप्टेंबरपर्यंत कार्यमुक्त करण्याचे होते निर्देश

शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेची शिस्त अबाधित राखण्यासाठी मुख्य सचिवांनी १० सप्टेंबरपर्यंत अशा सर्व कर्मचाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार मुदत संपताच तब्बल ५७० कर्मचाऱ्यांना मूळ आस्थापनेवर पाठवण्यात आले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप मूळ विभागात नियुक्ती स्वीकारलेली नाही, त्यांचा अहवाल १५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

 

 

Back to top button
Don`t copy text!