
राज्यभरात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके वाळू लागली असून महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाद्वारे संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ११ सप्टेंबर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने महिनाभरापासून मारलेल्या दडीमुळे खरीप हंगामातील पिके सुकू लागली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित भागांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे पाहणी करून पंचनामे करतील आणि एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
तिन्ही यंत्रणा संयुक्तपणे करणार पंचनामे
राज्यात विशेषतः कोरडवाहू भागांत सोयाबीन, कापूस, बाजरी यांसारखी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची संयुक्त पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेतील आणि अहवाल शासनाकडे सादर करतील.
नुकसानभरपाईबाबत लवकरच निर्णय
पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासन घेणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि पावसाच्या तीव्र तुटवड्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकार पूर्ण पाठबळ देईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सर्व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.