
थेट WhatsApp वर मिळवा
एसटी महामंडळाच्या एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्डधारकांसाठी प्रशासनाने अत्यंत सोयीस्कर निर्णय घेतला आहे. आता महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्व प्रवाशांना आपल्या कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यास बसस्थानकावरील केंद्रांवर रांगेत उभे न राहता थेट बसमधील वाहकाकडूनच (कंडक्टर) स्मार्ट कार्ड रिचार्ज करता येणार आहे.
स्थैर्य, सांगली, दि. १८ सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी (NCMC) स्मार्ट कार्डधारकांना आता प्रवास करताना रिचार्ज संपल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी एसटी प्रशासनाने थेट बसमध्येच वाहकांद्वारे (कंडक्टर) ई-टिकीट मशिनचा (ETIM) वापर करून एनसीएमसी कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवासादरम्यान होणार तत्काळ रिचार्ज
एसटीच्या माध्यमातून महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ आणि ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी सवलत योजना राबवली जाते. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे एनसीएमसी स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य आहे. मात्र, अनेकदा प्रवासादरम्यान किंवा ऐनवेळी कार्डमधील पैसे संपल्यामुळे प्रवाशांना तिकीट केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहावे लागत असे. नवीन सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यानच वाहकाकडे रोख अथवा क्यूआर कोडद्वारे पेमेंट करून स्मार्ट कार्ड तात्काळ रिचार्ज करून घेता येणार आहे.
सुविधा सुलभ आणि पारदर्शक
एसटी कर्मचाऱ्यांना आणि वाहकांना या नव्या सुविधेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाहकांच्या ई-टिकीट मशिनमध्ये रिचार्ज पर्याय समाविष्ट करण्यात आला असून, रिचार्ज होताच प्रवाशांना तत्काळ पावती मिळण्याची सोय करण्यात आली आहे. या डिजिटल सुविधेमुळे एसटी प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेत मोठी गती येणार आहे.