साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे निलंबित; शासन स्तरावर मोठी कारवाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दहावी-बारावी परीक्षेतील अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १८ सप्टेंबर : साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील प्रशासकीय निष्काळजीपणा, कामकाजातील त्रुटी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली असून यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

परीक्षेतील त्रुटी आणि प्रशासकीय निष्काळजीपणा

फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान चोपडे यांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. परीक्षाविषयक तांत्रिक यंत्रणेवर योग्य नियंत्रण न ठेवणे, तक्रारींची विहित मुदतीत सोडवणूक न करणे आणि फलटण तालुक्यातील विडणी प्रकरणासह विविध कामे प्रलंबित ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या शिफारसीनंतर ही कारवाई करण्यात आली.

बैठकांना अनुपस्थिती आणि शिस्तभंग

यापूर्वी विभागीय चौकशी सुरू असतानाही चोपडे यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. पालकमंत्री व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या अतिमहत्त्वाच्या शासकीय आढावा बैठकांना तसेच जिल्हा परिषदेच्या बैठकांना त्यांनी सातत्याने दांडी मारली. या सर्व बाबी प्रशासकीय शिस्तीचा भंग करणाऱ्या ठरल्याने अखेर शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

 

 

Back to top button
Don`t copy text!