फास्टॅग बँक बदलण्यासाठी आता स्टिकर काढण्याची गरज नाही; सरकारच्या नव्या सुविधेचा कसा घ्यावा लाभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘वन टॅग’ (OneTag) ही नवी सुविधा सुरू केली आहे. या पोर्टॅबिलिटी सुविधेमुळे वाहनधारकांना आपल्या वाहनावरील जुने फास्टॅग स्टिकर न काढता थेट डिजिटल पद्धतीने बँक बदलण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १८ सप्टेंबर : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर वाहनधारकांचा वेळ वाचावा आणि डिजिटल व्यवहार अधिक सुलभ व्हावेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग पोर्टॅबिलिटी सुविधा सुरू केली आहे. ‘वन टॅग’ नावाच्या या नव्या प्रणालीमुळे आता मोबाईल सिम कार्डप्रमाणेच फास्टॅगची बँक बदलणे शक्य होणार आहे. यासाठी वाहनावरील जुने स्टिकर काढण्याची किंवा नवीन फास्टॅग खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

राजमार्गयात्रा ॲपद्वारे होणार प्रक्रिया

नव्या सुविधेनुसार वाहनधारक ‘राजमार्गयात्रा’ (Rajmargyatra) या मोबाईल ॲपचा वापर करून अत्यंत सोप्या पद्धतीने आपली फास्टॅग बँक बदलू शकतात. एनपीसीआय (NPCI) आणि आयएचएमसीएल (IHMCL) यांनी संयुक्तपणे ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. बँक बदलली तरी वाहनाचा टॅग आयडी आणि नोंदणी क्रमांक तोच राहणार आहे.

पोर्टॅबिलिटीसाठी सोप्या पायऱ्या

बँक बदलण्यासाठी वाहनधारकाला प्रथम राजमार्गयात्रा ॲपवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉगिन करावे लागेल. त्यानंतर वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून पोर्टॅबिलिटीची पात्रता तपासावी लागेल. सध्याच्या बँकेकडून ओटीपी (OTP) आल्यानंतर तो प्रविष्ट करून नवीन बँकेची निवड करता येईल. नवीन बँकेत पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जुन्या खात्यातील उर्वरित रक्कम परत केली जाईल आणि नवीन बँक सेवा सुरू होईल. एका पोर्टॅबिलिटीनंतर पुढील सहा महिन्यांच्या कालावधीनंतरच पुन्हा बँक बदलता येईल.

 

 

Back to top button
Don`t copy text!