सोलापूर: रोहन उपळेकर यांना पुरुषोत्तम पुरस्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

श्री संत साहित्य सेवा संघ, सोलापूर यांच्या वतीने संत साहित्यातील योगदानाबद्दल यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार रोहन उपळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

स्थैर्य, सोलापूर, दि. 20 जुलै : श्री संत साहित्य सेवा संघ, सोलापूर यांच्या वतीने संत साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा यंदाचा ‘पुरुषोत्तम पुरस्कार’ रोहन उपळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्माननिधी आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

संस्थेचे आध्यात्मिक कार्य

भाऊ धावरे आणि दादा अंकुलकर यांनी तीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने सोलापूरच्या आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रवचने, नामसंकीर्तन सप्ताहासोबतच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध या ग्रंथांचे सामुदायिक पठण केले जाते. आळंदी, देहू, सासवड, नृसिंहवाडी, गाणगापूर, सज्जनगड, पैठण आणि नेवासे येथे भाविकांना सोबत घेऊन पारायण सेवा राबवली जाते. आध्यात्मिक क्षेत्रात नवीन लेखकांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने केले असून, आतापर्यंत ५५ ग्रंथ अल्पमूल्यात प्रकाशित केले आहेत.

पुरुषोत्तम पुरस्काराची परंपरा

गेल्या पंधरा वर्षांपासून संत साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना संस्थेतर्फे पुरुषोत्तम पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यापूर्वी नागनाथशास्त्री कोटगीरकर, डॉ. रा. ल. जोशी, सरलाताई बाबर, नारायणकाका कुलकर्णी, डॉ. अरुण प्रभुणे, विद्याधर ताठे यांच्यासह पंधरा मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यावर्षी रोहन उपळेकर यांना हा बहुमान मिळाला आहे.

संस्थेची वाटचाल

१९९९ पासून सुधाकर देशमुख हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. भाविकांनी दिलेल्या देणगीतून संस्थेचा कारभार चालतो. संस्थेच्या विश्वस्त मंडळात कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव गणेश सांगलीकर, सहसचिव विश्वास जतकर, संजीव कुसूरकर, डॉ. माधवी रायते, ज्ञानेश थावरे, डॉ. अपर्णा कल्याणकर, प्रमोद कामतकर, मनोज कुलकर्णी आणि श्रीकांत तुळजापूरकर यांचा समावेश आहे.

Back to top button
Don`t copy text!