
थेट WhatsApp वर मिळवा
एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड नोंदणीत महत्त्वाचे बदल केले आहेत. बायोमेट्रिक न जुळल्यास आता आधार ओटीपीने नोंदणी करता येईल. कार्ड हरवल्यास पुन्हा मिळेल.
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बायोमेट्रिक ठसे न जुळणाऱ्या प्रवाशांना आता थेट आधार ओटीपीच्या माध्यमातून कार्ड नोंदणी करता येणार असून, प्रवाशांचा सवलतीचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
आधार ओटीपीने नोंदणीची सुविधा
ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक मशीनवर जुळत नाहीत, त्यांच्यासाठी २१ सप्टेंबरपासून आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न करू शकलेल्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
हरवलेले कार्ड पुन्हा मिळवण्याची सोय
हरवलेले किंवा चोरीला गेलेले एनसीएमसी कार्ड ब्लॉक करून नव्याने नोंदणी करण्याची सुविधाही २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी १९९ रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तसेच, १९ सप्टेंबरपर्यंत कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्डचे प्रत्यक्ष वितरण केले जाणार आहे.
क्यूआर कोड पावतीवर सवलतीचा प्रवास
कार्ड नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना सध्या क्यूआर कोड असलेली पावती दिली जात आहे. बसमधील ईटीआयएम मशीनवर ही पावती स्कॅन करून सवलतीचे तिकीट दिले जाईल. ही पावती ३० दिवसांसाठी ग्राह्य राहणार आहे. या मुदतीत लाभार्थ्यांनी एनसीएमसी कार्ड ॲक्टिव्हेट करून त्यात टॉप-अप करणे बंधनकारक आहे. प्रवासातील सवलत अखंडित ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.