
थेट WhatsApp वर मिळवा
रेशन कार्डाशी संबंधित सेवांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. नवीन कार्डासह नाव दुरुस्ती, समावेश-वगळणे आणि पत्ता बदलासाठी नवे नियम लागू झाले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. १९ सप्टेंबर : नवीन रेशन कार्ड काढणे, नावात दुरुस्ती करणे, नाव समाविष्ट किंवा वगळणे आणि पत्ता बदलणे आता अधिक सुलभ होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) अंतर्गत प्रशासकीय टप्पे आणि आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने १५ सप्टेंबर रोजी याबाबतचा निर्णय जारी केला असून विविध सेवांसाठी निश्चित कालमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
रेशन कार्ड किती दिवसांत मिळणार?
अंत्योदय, पीएचएच आणि एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांसाठी नवीन रेशन कार्ड देण्याची कालमर्यादा १८ दिवस निश्चित करण्यात आली आहे. एनपीएच आणि पांढऱ्या रेशन कार्डासाठी ही कालमर्यादा २१ दिवस असेल.
रेशन कार्डात नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी गृहभेटीची आवश्यकता नसल्यास ही सेवा अवघ्या ३ दिवसांत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नावाची दुरुस्ती, नाव समाविष्ट किंवा वगळणे तसेच पत्ता बदलण्याच्या प्रक्रियेतील प्रशासकीय टप्पेही कमी करण्यात आले आहेत.
पुन्हा पुन्हा कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत
नागरिकांची माहिती अन्य शासकीय प्रणालीमध्ये किंवा संबंधित विभागाकडे यापूर्वीच उपलब्ध असल्यास ती पुन्हा अर्जदाराकडून मागवू नये, अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शक्य असेल तेथे विविध शासकीय प्रणालींमध्ये माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे.
कायदेशीर तरतूद नसलेल्या प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्राऐवजी आवश्यकतेनुसार स्वघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यासह प्रक्रियेतील अनावश्यक टप्पे कमी होणार आहेत.
प्रमाणपत्रावर मिळणार क्यूआर कोड
विभागाच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्याने अंतिम प्रमाणपत्रही ऑनलाइन दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राची सत्यता सहज पडताळता यावी यासाठी त्यावर क्यूआर कोड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सेवा हमी कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या २३ वरून २० करण्यात आली आहे. नागरिकांसाठीच्या जी२सी सेवा ७ वरून ४ करण्यात आल्या असून त्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध असतील. व्यवसायांसाठीच्या १६ जी२बी सेवा ‘मैत्री’ पोर्टलद्वारे उपलब्ध राहणार आहेत.
वजन-माप परवान्यांनाही मिळणार गती
वैध मापनशास्त्र विभागाच्या व्यवसायविषयक सेवांमध्येही बदल करण्यात आले आहेत. वजन व माप उत्पादक, दुरुस्तीदार आणि विक्रेत्यांचे परवाने तसेच पॅकेज्ड कमोडिटीजशी संबंधित नोंदणी प्रक्रियेतील कागदपत्रे आणि प्रशासकीय टप्पे कमी करण्यात आले आहेत.
काही परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ऑटो रिन्युअलची तरतूद करण्यात आली आहे. वजन-माप उत्पादक परवाना देण्याची कालमर्यादा ३५ दिवसांवरून १५ दिवसांवर, तर वजन-माप विक्रेता परवान्याची कालमर्यादा ३५ दिवसांवरून ७ दिवसांवर आणण्यात आली आहे.