माढा लोकसभेबाबत चार – आठ दिवसात निर्णय जाहीर करणार : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२४ | फलटण | गत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. परंतु या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. आज सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. या भावना आम्ही वरिष्ठ पातळीवर कळणार आहोत व त्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत; असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण, माण व खटाव तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण सर्वजण राजकारण करीत असताना भावनेच्या घरामध्ये राजकारण करून चालणार नाही. भावनेच्या भरात तुतारी किंवा मशाल घेऊ; असे म्हणून आपल्याला चालणार नाही. भावना विरहित राजकारण करणे गरजेचे आहे. आता असलेली निवडणुकी शेवटची निवडणूक नाही; त्यामुळे सर्वांनी थोड सबुरीने घेणे आवश्यक आहे. महायुतीच्या आत्ता जाहीर झालेल्या उमेदवाराच्या समवेत आपण एका स्टेजवर बसू शकत नाही. संजीवराजे यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी तुमच्यासह आमची सुद्धा इच्छा होती. आमची इच्छा मी आमच्या पक्षाकडे व्यक्त केलेली होती; असेही यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की; आम्ही तिकिटासाठी कधीही दिल्लीला गेलेलो नाही. फलटण तालुक्यामध्ये यापूर्वी सुद्धा विरोधक होते त्यामध्ये हणमंतराव यांचा गट असेल; चिमणराव यांचा किंवा अगदी कृष्णचंद्र भोईटे व हिंदुराव यांचा गट होता राजकारणामध्ये विरोध करण्याशिवाय आम्ही इतर कुठेही विरोध केलेला नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आगामी चार दिवसांमध्ये निर्णय जाहीर करणार आहे.

आत्ता असलेले तालुका प्रशासन म्हणजे यांच्या घरातील कामगार असल्यासारखे वागत आहे. प्रशासन यांच्या हाताखाली काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. मुद्दामून आमच्या कार्यकर्त्यांना व्यक्तिगतरीत्या टार्गेट करण्याचे काम करीत आहेत. माण तालुक्याचे आमदार तर स्वतः जिल्हा चालवत असल्याच्या अविर्भावामध्ये वावरत असतात. अशा माणसाच्या हातामध्ये जर जिल्हा गेला तर जिल्ह्याची काय अवस्था होईल ? असा प्रश्न सुद्धा यावेळी श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित केला

यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले की; खासदार रणजितसिंह व आमची काही घरची भांडणे नाहीत. आमची सुद्धा राजकीयच वैर आहे. आगामी काही दिवसांमध्ये आपण आपली भूमिका जाहीर करणार आहोत. उमेदवार बदलण्यासाठी आपण एक शिष्टमंडळ घेऊन सर्वांना भेटणार आहोत‌. सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. एक राजकीय संस्कृती आहे. आपली राजकीय संस्कृती आपण विसरत आहे. दोन नंबरचे धंद्यांना सुरक्षित करण्याचे काम हे विद्यमान खासदार करीत आहेत. यांना भारतीय जनता पार्टीची संस्कृती माहीत नाही. हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण फलटण विधानसभा मतदारसंघासहित माण, खटाव व कोरेगाव मतदारसंघाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्याला फक्त अजितदादा पवार यांच्याशी देणे – घेणे आहे. इतर कोणा बाबत आपण बोलण्याइतपत मी मोठा नाही; असे यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले

यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले की; गेली २५ वर्षे हे सुध्दा सत्तेत होते. यांचे नेते पृथ्वीराज चव्हाण सुध्दा मुख्यमंत्री होते. त्यांचे व यांचे सुध्दा सबंध जवळचे होते. माणुसकी नसलेल्यासोबत राजकारण करू शकत नाही. आता कोणतीही बैठक होणार नाही. आता आमचे शिष्टमंडळ भेटून उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करणार आहे.


Back to top button
Don`t copy text!