श्रीमंत रघुनाथराजे यांनी बाजार समितीचा नावलौकिक वाढविला : आ. श्रीमंत रामराजे; जर परस्पर आपला फॉर्म भरला तर त्यांचा विचार केला जाणार नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ एप्रिल २०२३ । फलटण । फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी २ दिवसात घेतल्या जातील नंतरच उमेदवार यादी जाहीर केली जाईल आणि त्यांचे उमेदवारी अर्ज सोमवार दि. ३ एप्रिल रोजी दाखल करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी किंवा यादी बाहेरील कोणी जर परस्पर आपला फॉर्म भरला तर त्यांचा विचार केला जाणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या चेअरमन पदाची जबाबदारी २ टर्म मध्ये सुमारे १३ वर्षे सांभाळताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निश्चितच चांगले काम करुन बाजार समितीचा नावलौकिक राज्यभर वाढविला असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारखाना चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी व्हा. चेअरमन बजरंग खटके, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, महानंद मुंबईचे संचालक डी. के. पवार, पंचायत समिती माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, सौ. रेश्मा भोसले, मोहनराव लोखंडे, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, राजेंद्र भोईटे आदी मान्यवरांसह तालुक्यातील विकास सोसायटी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विविध भागात कृषीदेव पेट्रोल पंप उभारणीचे नियोजन करुन त्यापैकी ३ पंप प्रत्यक्ष सुरु करण्यात, ४ पंपाची कामे अंतीम टप्प्यात पूर्णत्वाकडे जात असून उर्वरित पंप सुरु करण्यासाठी केलेले प्रयत्न, कार्डीयाक ॲम्बुलन्स सुरु करणे किंवा कोरोना कालावधीत डॉक्टरांच्या पथकासह औषधे घेऊन जाऊन तालुक्याच्या ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा पुरविण्या बरोबर स्वतः लोकांना भेटून दिलासा देण्यासाठी केलेले उल्लेखनीय काम तसेच शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजना राबविताना घेतलेली ठोस भूमिका आणि व्हा. चेअरमन भगवानराव होळकर आणि संचालक यांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

तथापि भविष्यात बाजार समितीचा सेस वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखविली. आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, आज या मेळाव्याची गर्दी पाहुन आपल्याला मनस्वी आनंद झाला परंतु धडकी देखील भरली कारण यावरुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी इच्छुकांची संख्या निश्चितच मोठी असणार आहे; असेही मत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, भविष्यात आपल्याला निश्चितच पाणी प्रश्नावर संघर्ष करावा लागणार आहे, संघर्ष करण्याची सवय आपल्या कार्यकर्त्यांना अजिबात नाही परंतू आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. आगामी कालावधीमध्ये अनेक निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणूका होत असून या संस्था आपला आत्मा आहेत. या निवडणूका कसल्याही परिस्थितीत आपणाला जिंकाव्या लागणार आहेत, यामुळे पुढील विधानसभा निवडणूक आपणास निश्चित सोपी होणार आहे.

प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी आ. दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांची समयोचित भाषणे झाली.


Back to top button
Don`t copy text!