
थेट WhatsApp वर मिळवा
पवित्र प्रणालीद्वारे राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील रुपांतरित फेरीतून ४ हजार ३९० उमेदवारांची मुलाखतीशिवाय निवड प्रकारात शिफारस करण्यात आली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २२ सप्टेंबर : पवित्र प्रणालीद्वारे राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेतील रुपांतरित फेरीची (Converted Round) निवडयादी जाहीर करण्यात आली असून, मुलाखतीशिवाय निवड प्रकारात ४ हजार ३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांची २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कागदपत्र पडताळणी केली जाणार असून ९ ऑक्टोबरपर्यंत त्यांना पदस्थापना दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
समांतर आरक्षणातील जागांसाठी निर्णय
यापूर्वी मुलाखतीशिवाय निवड प्रकारात १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, समांतर आरक्षण आणि राखीव प्रवर्गातील ६ हजार ६३५ पदे उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिली होती. या समांतर आरक्षणातील पदांसाठी रुपांतरित फेरी राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. शासनाच्या मंजुरीनंतर राबवलेल्या या फेरीतून ४ हजार ३९० पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आता या प्रक्रियेनंतर २ हजार २४५ पदे रिक्त राहिली आहेत.
संस्थानिहाय निवडीचा तपशील आणि पुढील प्रक्रिया
रुपांतरित फेरीतून शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये जिल्हा परिषदेच्या ३ हजार १०५, महापालिकेच्या ४२७, आदिवासी विकास विभागाच्या ५२७, खासगी शिक्षण संस्थांच्या ३२४, नगरपालिकेच्या ५ आणि शासकीय विद्यानिकेतनच्या २ जागांचा समावेश आहे. रिक्त राहिलेल्या २ हजार २४५ जागांमध्ये अनुसूचित जमाती, पेसा क्षेत्र आणि उर्दू माध्यमाच्या जागांचा समावेश असून उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र रुपांतरित फेरी राबवण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे.
