वीर धरण परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा; एक हॉटेल जमीनदोस्त तर अनेक झाडे कोसळली


स्थैर्य, फलटण, दि. २ जून : वीर धरण परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वाऱ्याच्या जोरदार तडाख्याने धरणालगत असलेले एक हॉटेल पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

वादळी वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की, परिसरातील काही हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांच्या छतांचे पत्रे उडून गेले. यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यालगतची अनेक मोठी झाडे कोसळली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पंढरपूर फाटा ते लोणंद या मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेऊन वाहने सावधगिरीने चालवावीत, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेतली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून रस्त्यांवर पडलेली झाडे आणि इतर अडथळे हटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!