

स्थैर्य, सातारा, दि. २ जून : सातारा शहरातील राजवाडा परिसर सध्या स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या विविध जातींच्या आंब्यांनी बहरून गेला आहे. देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यांची बाजारातील आवक कमी झाल्यानंतर आता रायवळ, केशर, नीलम आणि स्थानिक हापूस आंब्यांनी बाजारपेठेत जागा घेतली असून, खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला कोकणातील देवगड आणि रत्नागिरी येथून हापूस तसेच पायरी आंब्यांची मोठी आवक साताऱ्यात झाली होती. मात्र, आता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कोकणातील आंब्याची आवक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील बाजारपेठेत आता स्थानिक आंब्यांना मोठी मागणी वाढली आहे.
सातारा शहर आणि परिसरातील स्थानिक आंबा उत्पादक शेतकरी आपला माल थेट विक्रीसाठी राजवाडा परिसरात आणत आहेत. पिवळ्या धमक रंगाच्या आणि वेगवेगळ्या आकारांच्या आंब्यांच्या पाट्यांच्या रांगा या परिसरात पाहायला मिळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रायवळ, केशर, नीलम आणि स्थानिक हापूस या जातींच्या आंब्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
स्थानिक उत्पादकांकडून थेट विक्री होत असल्याने ग्राहकांना ताज्या आणि दर्जेदार आंब्यांचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. बाजारात या आंब्यांचे दर ५० रुपयांपासून ते ४०० रुपये प्रति डझनपर्यंत आहेत. आंब्याच्या जातीनुसार आणि आकारानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत.
कोकणच्या हापूसनंतर आता स्थानिक आणि गावरान आंब्यांची चव चाखण्यासाठी सातारकरांची पावले राजवाडा परिसराकडे वळत आहेत. रास्त दरात आणि थेट उत्पादकांकडून आंबे मिळत असल्याने नागरिकांचा या खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आंब्यांची खरेदी करत आहेत.
(छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)
