

बोडकेवाडी, जाधववाडा, धुमाळवाडी, निरगुडी भागात गारवा; शेतकरी शेतीच्या पूर्वतयारीला लागले
स्थैर्य, गिरवी, दि. ३ जून : फलटण तालुक्यातील गिरवी परिसरासह बोडकेवाडी, जाधववाडा, धुमाळवाडी आणि निरगुडी या भागांत मान्सूनपूर्व भिज पावसाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे वातावरणात काही काळ सुखद गारवा जाणवला, मात्र नंतर पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा उकाडा व उष्णता निर्माण झाली. असे असले तरी, वादळी वारा आणि भिज पावसामुळे यंदाच्या चांगल्या पावसाळ्याच्या आशा पल्लवित झाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
पिकांच्या उगवणीला मिळणार जीवदान
मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला तर पावसाच्या आशेवर अगोदरच पेरणी केलेल्या तूर, सोयाबीन, मका, कडवळ इत्यादी पिकांची उगवण चांगली होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर असाच चांगला पाऊस झाला, तर ज्यांनी शेतात पूर्वमशागत करून ठेवली आहे, त्या शेतकऱ्यांना वापशावर पाळी घालून पेरणी करणे शक्य होईल, अशी माहिती जाणकार शेतकऱ्यांनी ‘दैनिक स्थैर्य’शी बोलताना दिली.
पेरणीच्या कामांना वेग
यावर्षी अधिक महिना आल्यामुळे मान्सूनच्या आगमनाची चाहूल उशिरा लागेल आणि परिणामी पेरणीचा हंगाम लांबणीवर पडेल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. असे वाटत असतानाच मान्सूनपूर्व भिज पावसाचे आगमन झाल्यामुळे गिरवी व परिसरातील शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. या रिमझिम पावसामुळे शेतकरी आता मोठ्या उत्साहाने शेतीच्या आणि पेरणीच्या तयारीला लागल्याचे चित्र गिरवी परिसरात दिसून येत आहे.