मुख्यमंत्र्यांकडून सीरमची पाहणी


स्थैर्य, पुणे, दि.२२: संपूर्ण देशाला कोरोनाची ‘कोव्हिशील्ड’ लस पुरवणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टिट्यूला काल(दि.21) भीषण आल लागली होती. या आगीत 5 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरम इंस्टिट्यूटची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यांना प्रतिक्रिया दिली. ‘आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोरोनाच्या संकट काळात सीरम इंस्टिट्यूट आशेचा किरण आहे. त्यामुळे सीरमला आग लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. पण, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे ही आग लागली नव्हती. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

ठाकरे पुढे म्हणाले की, ‘आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त केली. त्यामुळे खरंच असे झाले का याचा तपास केला जाईल. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढू नका. यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात देईल’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आगीमुळे हजारो कोटींचे नुकसान

यावेळी सीरमचे प्रमुख अदार पुनावाला यांनी सांगितले की, या आगीमुळे कोरोना लसीवर काही परिणाम होणार नाही. लागलेल्या आगीत रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लसीचे नुकसान झाले. आगीत महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाल्यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. भविष्यात आम्ही या इमारतीत कोरोनाची लस आणून ठेवणार होतो. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता’, असे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!