फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते; हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर, जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे, आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर, परमार्थाला दुसर्याची गरजच नाही; मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या, हे जसे घराचे साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी, किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथून सगळा सारखाच. गरीबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकार्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावे. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो; आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते, तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखांतच लोटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो, ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी, मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन, तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. विकारांना वश न होता, प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही.
थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे चुकते ते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हांला का दिसू नये ? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून. कसेही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून, अजाणून, श्रद्धेने, अश्रद्धेने, कसेही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास ! नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहू या.