फलटण: स्टेटस वादातील आरोपी आजिम अत्तारचे अतिक्रमित घर पाडा; सकल हिंदू समाजाची नगरपालिकेकडे आक्रमक मागणी


छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस वादातील आरोपी आजिम अत्तार याचे बेकायदेशीर घर पाडण्यात यावे, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन दिले.

स्थैर्य, फलटण, दि. 19 मे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठेवलेल्या स्टेटसवरून फलटण शहरात निर्माण झालेल्या वादानंतर, पोलिसांनी आरोपी आजिम हसन अत्तार याला अटक केली आहे. आता या प्रकरणात फलटण शहरातील सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेत, आरोपीचे नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमित घर त्वरित जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना रीतसर निवेदन देण्यात आले.

अतिक्रमित घरावर कारवाईची मागणी:

१४ मे रोजी स्टेटसच्या कारणावरून एका तरुणाला धमकावून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आजिम अत्तार याला फलटण शहर पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अटकेनंतर, आरोपीचे फलटण नगरपरिषद हद्दीतील राहते घर हे अतिक्रमण करून आणि बेकायदेशीररीत्या बांधलेले असल्याचा दावा सकल हिंदू समाजाकडून करण्यात आला आहे. अशा प्रवृत्तींवर वचक बसवण्यासाठी या अतिक्रमित घरावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून ते घर पाडण्यात यावे, अशी आग्रही मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांची ग्वाही:

या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या एका शिष्टमंडळाने आज फलटण नगरपरिषदेत जाऊन मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, “संबंधित घराच्या सर्व बाबींची आणि कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी करून या प्रकरणात निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना दिली आहे.

प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आता नगरपरिषद या बेकायदेशीर बांधकामावर नेमकी काय आणि कधी कारवाई करणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!