विठ्ठल नामाची शाळा भरली!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण |
वारकर्‍यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि ‘विठू नामाचा गजर’ अशा विठ्ठलमय वातावरणात फलटण शहरातील आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला.

फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल हे नवनवीन उपक्रम राबवण्यामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आपली ही परंपरा जपत आज श्री संतश्रेेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व रिंगण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल- रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान देव, संत मुक्ताई, संत सावता माळी, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सखुबाई, संत जनाबाई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे आकर्षण ठरले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण पवन भारत सावंत महाराज हे लाभले. त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशा दहा पायी वारी केल्या आहेत. प्रमुख पाहुणे व डॉ.वैशाली शिंदे मॅडम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. व श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची आरती करण्यात आली.

विठ्ठल नामाची शाळा भरली,
शाळा शिकताना तहान भूक हरली
अगदी अशाच पद्धतीने सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा धारण करून मुलांनी हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं-मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत असलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि ‘विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीत बाल वारकरी शाळेमध्ये अवतरले. त्यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला अन् अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पहावयास मिळाले. वेगवेगळ्या संतांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी संतांविषयी माहिती सांगितली व वारकरी संप्रदायाला मानवंदना म्हणून नृत्य सादर करण्यात आले. या नृत्यामधून वारी आळंदीवरून निघाल्यापासून ते पंढरपूर पर्यंतचा प्रवास या नृत्यातून पाहावयास मिळाला. त्यामुळे पालखीचा मुक्काम तसेच अश्वाचा रिंगण सोहळा याचा आनंद या विद्यार्थ्यांना घेता आला. तसेच प्रमुख पाहुणे पवन सावंत महाराज यांनीही या आयडियल वारीमध्ये सहभाग घेतला व नृत्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

एकंदरीत काय तर या सगळ्यांनी ‘विठ्ठल हरी नामा’च्या जयघोषात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्व विद्यार्थी व पालक यांनीही सहभाग घेऊन वारीचा आनंद घेतला. विद्यार्थी व पालकांना अल्पोहाराची व्यवस्था स्कूलकडून करण्यात आली होती. याचा आनंद विद्यार्थी व पालक यांनी घेतला.

आपली आषाढी वारीची परंपरा जपत विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती जपण्याचे संस्कार व्हावेत यासाठी या वारीचे नियोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे मॅडम यांनी केले. अगदी आरती, नृत्य, अश्वांचे रिंगण व दिंडी यांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली. आपली वारकरी परंपरा अशीच चालू राहावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

डॉ. वैशाली शिंदे मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या मेहनतीने हा अद्भूत आणि नयनरम्य सोहळा उत्कृष्टरित्या पार पडला. या सोहळ्याचे विविध स्तरामधून कौतुक करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!