शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर; भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे: जिल्हाधिकारी संतोष पाटील

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, सातारा, दि. १६ जून : शाळा ही जीवन शिक्षण देणारी मंदिरे आहेत; त्यामुळे शाळेतील भौतिक सुविधांपेक्षा तेथे दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या ‘स्वागत व प्रवेशोत्सव २०२६’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका भारती शिंदे, किरण पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतापसिंह हायस्कूलच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा:

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, “प्रतापसिंह हायस्कूलला एक मोठी आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे प्रकांड पंडित घडवले आहेत. तसेच, मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री धनजीशा कूपर यांच्यासह अनेक दिग्गज उद्योजक, कृषितज्ज्ञ आणि नेते या शाळेने देशाला दिले आहेत.”

शाळेचा हा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्याची आणि शाळेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्याची जबाबदारी आता विद्यार्थ्यांची आहे. आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी नक्कीच काही विद्यार्थी भविष्यात आय.ए.एस. (IAS) अधिकारी होतील आणि त्यांच्यासाठी असाच सत्कार सोहळा आयोजित केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवोदित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!