
धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने नीरा उजवा कालवा बंद करण्यात आला असून फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले.
स्थैर्य, फलटण, दि. १७ जून : धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने नीरा उजवा कालवा बंद करण्यात आला आहे. यामुळे फलटण शहरामध्ये आगामी ४५ दिवस एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. १८ जूनपासून या नवीन सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने फलटण शहराला पाणी पुरवणारा नीरा उजवा कालवा १२ जून रोजी बंद करण्यात आला आहे. हा कालवा साधारण ४५ दिवस बंद राहणार आहे. नगरपरिषदेच्या साठवण तलावातील सध्याचा पाणीसाठा पुढील ४५ दिवस पुरेल इतका उपलब्ध नसल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पाणी कपातीचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे.
नगरपरिषदेने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार पेठ सोमवार संपूर्ण भाग, पेठ मंगळवार संपूर्ण भाग, पेठ महतपुरा आणि जिंती नाका संपूर्ण भाग या परिसरात १८, २०, २२, २४, २६, २८ आणि ३० जून रोजी पाणीपुरवठा केला जाईल. तर फलटण शहरातील उर्वरित संपूर्ण भागात १९, २१, २३, २५, २७ आणि २९ जून रोजी पाणी दिले जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.