कोळकीत वीजखंडितामुळे व्यापारी हैराण – महावितरणला निवेदन

कोळकी परिसरातील अक्षतनगर आणि मालोजीनगरमध्ये दररोज होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त व्यापाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

स्थैर्य, कोळकी, दि. ०१ ऑगस्ट : कोळकी परिसरातील अक्षतनगर व मालोजीनगर भागात दररोज ५ ते ६ वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. या अघोषित वीजखंडितामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, संतप्त व्यापाऱ्यांनी एकत्र येत महावितरण कंपनीच्या फलटण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

व्यवसायावर गंभीर परिणाम

व्यापाऱ्यांच्या तक्रारीनुसार, दुकानांचा व्यवसाय पूर्णपणे विजेवर अवलंबून असल्याने वीज जाताच बिलिंग मशीन, कॉम्प्युटर, फ्रिज आणि इंटरनेट सेवा बंद पडतात. ऐन गर्दीच्या वेळी वीज गेल्याने ग्राहकांना माघारी फिरावे लागते. कमर्शिअल दराने लाइटबिल भरूनही ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असल्याने दुकानदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

तांत्रिक दुरुस्ती व अखंड वीजपुरवठ्याची मागणी

कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने कामाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. तसेच तांत्रिक अडचणींच्या वेळी लाईनमन फोन उचलत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. महावितरणने या समस्येची तातडीने दखल घेऊन तांत्रिक दुरुस्ती करावी आणि अखंड वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र भूमिका घेण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Back to top button
Don`t copy text!