

स्थैर्य, सातारा, दि. 17 : विसावानाका येथे दि. 12 रोजी धारदार शस्त्रांनी हल्ला करून जबरी चोरी करणार्या कोयता गँगच्या मोरक्यासह एका साथीदाराच्या सातारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत राजू भिसे वय 18 रा. सैदापूर सातारा व अमिर सलीम शेख वय 19 रा. वनवासवाडी, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, दि. 12 रोजी संबंधित कोयता गँगने शिवाजी संदीपान सरगर यांच्या ओमनी गाडीस मोटरसायकली आडव्या मारुन कोयत्याने गाडीची काच फोडली. यानंतर त्यांच्या पोटाला चाकु लावुन त्यांच्या खिशातून 2 हजार 700 रुपये काढुन घेवून निघुन गेले. त्यानंतर त्यानंतर खेड फाटा सातारा येथे उमेश आप्पाराव गायकवाड रा. लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा यांच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, पाकीटातील 1100 रुपये रोख, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पोस्टचे कार्ड घेवुन पळून गेले होते.
याप्रकरणी वरील दोघांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयीत धारदार हत्याराने गुन्हे करून दहशत माजवुन फरार झाले होते. हे गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आण्णासाहेब मांजरे यांना संशयीतांना तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पो.नि. आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांचे पथकास सुचना देवून मार्गदर्शन केले. या प्रकरणातील संशयीत सराईत असल्याने घटनेनंतर पूर्ण खबरदारी घेवून लपून बसले होते. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व कर्मचारी त्यांचा कसोशीने शोध घेत होते. दरम्यान, दि. 16 रोजी पोलिस पथकाला संशयीत गोडोली परिसरात असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने सापळा लावून दोन संशयीतांना ताब्यात घेतले.
त्यांना पोलीस स्टेशनला आणुन चौकशी केली असता दारू पिण्याकरिता पैसे पाहिजे असल्याने अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कदम करीत आहेत.
ही काररवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, किशोर तारळकर यांनी सहभाग घेतला.

