
स्थैर्य, वावरहिरे, दि.२: २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता गांधी यांची जयंती विविध स्वरुपात साजरी होत असताना माण तालुक्यातील शेवरी व पिंपरी येथे नेहरु युवा केंद्र माण तालुका समन्वयक माधुरी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधत नेहरु युवा मंडळामार्फत प्लाॅगिंग रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नेहरु युवा मंडळाच्या माध्यमातुन संपुर्ण गावातील स्वच्छता मोहिम राबवुन परिसर स्वच्छ करण्यात आला .प्लाॅगिंग म्हणजे हळुहळु धावताना परिसरातील कचरा वेचणे.यानुसार नेहरु युवा मंडळातील तरुणांनी कोरोना संसर्गापासुन स्वतःचा बचाव करीत सोशल डिस्टन्सचे पालन करीत साधारण दोन किलोमीटर रन करुन परिसरातील कचरा, प्लॅस्टिक गोळा करुन संपुर्ण परिसर स्वच्छ केला. महापुरुषाचे आचार,विचार,संस्कार पुढील पिढीमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने समाज उपयोगी व पर्यावरण पुरक उपक्रम राबवुन नेहरु युवा मंडळातील युवा वर्गाने शरीर स्वास्थ सोबतच परिसर स्वच्छ करणारी नाविण्यपुर्ण अशी संकल्पना राबवत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. या कार्यक्रमावेळी माण तालुका नेहरु युवा केंद्र पदाधिकारी, सदस्य,नेहरु युवा मंडळातील सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.