

स्थैर्य, सातारा, दि 19 – लेखक कधीही मरत नसतो तर तो पुस्तकाच्या रुपाने जिवंत राहतो, म्हणूनच सर्व साहित्यिकांनी परखडपणे, वास्तववादी लिखाण केले पाहिजे आणि आपल्या भाषेचे सौंदर्य जपायला हवे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आ. दि. बा. पाटील यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरीच्या वर्धापनदिनानिमित्त, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने आणि मान्यवरांची उपस्थितीत होती.
नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कारांचे मसाप शाहूपुरी शाखेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांचे स्वागत किशोर बेडकिहाळ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. प्रास्ताविक करताना डॉ.राजेंद्र माने यांनी मसाप शाहूपुरी शाखेविषयी माहिती सांगितली.
याप्रसंगी शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्यावरील चरित्र ग्रंथासाठी ग्रंथकार डॉ.पी.एन.शिंदे यांना बेबीताई कांबळे चरित्र पुरस्कार, ॲड.शंकर निकम यांच्या ‘गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू’ या पुस्तकाला रा.ना चव्हाण वैचारिक ग्रंथ पुरस्कार, मा रामकली पावसकर यांच्या ‘नीरव किना-यावर’ या काव्यसंग्रहाला कवी बा.सी. मर्ढेकर कविता पुरस्कार, ॲड सीमंतिनी नूलकर यांच्या ‘फुलांचे जंगली प्रदेश’ या पुस्तकास वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार, प्रा सुभाष गुरव यांच्या ‘ठिणग्या’ या कथासंग्रहाला प्रा अजित पाटील पुरस्कार, रवींद्र बेडकिहाळ यांनी लिहिलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील चरित्रात्मक ग्रंथाला विशेष साहित्यिक पुरस्कार , तर ज्येष्ठ साहित्यिक व.बा. बोधे यांना श्री छ प्रतापसिंह थोरले महाराज ज्येष्ठ साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक व. बा बोधे म्हणाले, साहित्यिकांच्या साहित्यकृतीवर प्रेम करा. नवलेखकांना दिलेल्या संदेशात ते म्हणाले, लेखकांनी लिहिताना सखोल अभ्यास करून आणि सातत्याने लिहावे. यावेळी विनोद कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दि.बा. पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे अभिनंदन केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मसाप शाहूपुरी शाखेच्या कार्याचे विशेष कौतुक त्यांनी केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषद सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वामी, श्रीधर साळुंखे, डॉ.संदीप श्रोत्री, प्रदीप कांबळे, मुकूंद फडके, विद्या पोळ, राजश्री शाह , श्रीराम नानल आदी मान्यवर आणि मसापचे अजित साळुंखे, सचिन सावंत, वजीर नदाफ, संजय माने, चंद्रकांत कांबिरे उपस्थित होते. आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकरताना व.वा.बोधे समवेत किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने, नंदकुमार सावंत व मान्यवर.