

स्थैर्य, सातारा दि. ४ जून : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माण तालुक्यातील वरकुटे मलवडीचे अभयसिंह जगताप निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची थेट लढत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्याशी होणार आहे. मात्र, अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांच्या भूमिकेमुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीत आठपैकी सात उमेदवारांचे अकरा अर्ज वैध ठरले आहेत. महाविकास आघाडीने प्रताप पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यापूर्वी अभयसिंह जगताप यांचा अर्ज अधिकृत कागदपत्रांसह त्यांचे सूचक सागर पोळ यांनी दाखल केला होता. त्यामुळे जगताप यांचा अर्ज महाविकास आघाडीचा अधिकृत अर्ज म्हणून ग्राह्य धरण्यात आला.
या तांत्रिक बाबीमुळे प्रताप पाटील यांचा अर्ज अपक्ष म्हणून स्वीकारण्यात आला आहे. आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप रिंगणात आहेत. या घडामोडीनंतर अभयसिंह जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून विजय मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना नेते तानाजी पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तानाजी पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते नक्की काय निर्णय घेणार आणि अंतिम लढत कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मतदारांची संख्या या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. सातारा जिल्ह्यात ४७२ तर सांगली जिल्ह्यात ४२३ मतदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक ३४५ मतदार आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे २११ मतदार आहेत.
इतर पक्षांचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ११९, शिवसेनेकडे १११, काँग्रेसकडे ७५ आणि अपक्ष ३१ मतदार आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्ष यांच्याकडे प्रत्येकी एक मतदार आहे.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत पक्षादेश (व्हिप) लागू होत नाही. त्यामुळे मतदारांची पळवापळवी आणि घोडेबाजार होण्याची शक्यता असते. कोणता मतदार कोणाला मतदान करेल, हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगणे कठीण असते. तानाजी पाटील यांच्या निर्णयानंतरच या निवडणुकीचे अंतिम चित्र आणि गणिते स्पष्ट होणार आहेत.
