अजिंक्यतारा कारखान्यातर्फे पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापन शेतकरी चर्चासत्र संपन्न


स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापन प्रकल्प प्रक्षेत्र भेट आणि शेतकरी चर्चासत्र पार पडले. सातारा तालुक्यातील विविध गावांमध्ये हे चर्चासत्र आयोजित करून शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सातारा तालुक्यातील वनगळ, आरळे, गोजेगाव, नागठाणे, अतीत, वर्णे आणि निगडी वंदन या गावांमध्ये हा कार्यक्रम झाला. या प्रक्षेत्र भेट आणि चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक पद्धतीने ऊस शेती कशी करावी, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व प्रकल्प समन्वयक धर्मेंद्र कुमार फाळके यांनी शेतकऱ्यांना खोडवा ऊस पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. खोडवा पिकात पाचट ठेवणे आवश्यक असून यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

जमिनीची पूर्वमशागत करताना सबसॉयलरचा वापर करावा, जेणेकरून जमिनीचा पोत सुधारतो. यासोबतच फाळके यांनी ऊस बियाणे निवड प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील मूलभूत ऊस बियाण्याचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

थेट बियाणे लागवडीपेक्षा प्रमाणित ऊस नर्सरीतून दर्जेदार रोपे खरेदी करून ऊस रोपाची लागण करणे अधिक फायदेशीर ठरते. तसेच खोडवा पिकात कलिंगड, खरबूज यांसारखी आंतरपिके घेतल्यास मुख्य पिकाचा उत्पादन खर्च निघतो आणि शेतकऱ्यांचा नफा शिल्लक राहतो, असेही फाळके यांनी स्पष्ट केले.

पूर्व हंगामी ऊस लागवडीचे फायदे आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा तसेच तागाचा वापर याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनात वाढ करणे शक्य होते, यावर भर देण्यात आला.

या प्रक्षेत्र भेट आणि चर्चासत्रास अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, ऊस विकास विभागातील कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!