दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2023 | फलटण | कारगील विजय दिनाचे पार्श्वभूमीवर सलग २४ वर्षे शहिदांना अभिवादन आणि राष्ट्रीय भावना वृध्दींगत करणारा, जातीय सलोखा अबाधीत राखणारा, समाजात स्नेहभाव व शांतता वाढविणारा उपक्रम राबविण्यात येतो ही प्रेरणादायी बाब असल्याचे नमूद करीत सातारा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस नाजीमभाई इनामदार यांनी संयोजकांना धन्यवाद दिले.
राष्ट्रीय एकात्मता विचार मंच, जनशक्ती युवा विकास प्रतिष्ठान, लोकमत प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अमिरखान मेटकरी यांनी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही कारगील दिनी दि. २६ जुलै रोजी हुतात्मा स्मारक, रविवार पेठ, फलटण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाजीमभाई इनामदार बोलत होते. यावेळी तानाजीराव जगताप, मुधोजी हायस्कूलचे शिक्षक पवार सर, मेजर घोरपडे, प्रा. व्ही. बी. देवकाते, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेल शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, आसिफभाई शेख, बापूराव शेंडे यांच्या सह मुधोजी हायस्कूल एन. सी. सी. व एन. एस. एस. चे विद्यार्थी, त्यांचे प्रशिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन केल्यानंतर हुतात्मा स्मारक व शहिद अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एन. सी. सी. व एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी पथ संचलन केले व हुतात्मा स्मारक व शहिद अमर जवान स्मारकास मानवंदना दिली.
अमिरखान मेटकरी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आपण गेली ४० वर्षे विविध उपक्रम राबवीत असून त्याद्वारे विद्यार्थी व समाजातील विविध घटकांच्या मनामध्ये देश प्रेमाची भावना वृध्दींगत व्हावी, समाजात आपुलकी व प्रेम भावना वाढावी यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
तानाजीराव जगताप यांनी विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय एकात्मता व स्नेहभाव वाढविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.