महादरवाजा मेट व गंगाद्वार मेट येथील रस्ता व पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । नाशिक । महादरवाजा मेट व गंगाद्वार मेट  येथील पाणी व रस्त्यांची समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार, असे आश्वासन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांना दिले आहे.

त्र्यंबकेश्वर येथील महादरवाजा मेट व गंगाद्वार मेट या दोन्ही ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठ, मंच, खुर्च्या थेट बाजूला सारून त्यांनी जमीनीवर बसून महिला भगिनींशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर,  माजी आमदार निर्मला गावित, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,  पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,  तहसीलदार  परमेश्वर कासुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथे साठवण बंधारा निर्माण करण्यात यावा. येथे 50 मीटर लांबी व रूंदीचा साठवण तलाव तयार करून त्याला सौर उर्जेवर चालणारी पाणी पुरवठा योजना करण्यात यावी. तसेच मेट येथील रस्ते व इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार, असेही पर्यटन मंत्री श्री.ठाकरे यांनी परिसराची पाहणी करतांना सांगितले.

आरोग्य उपकेंद्रासह सोडवणार विजेची समस्या

पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी महिला भगिनींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आजारी, ग्रामस्थ, गर्भवती महिला यांना डोलीत घालून न्यावे लागते. त्यासाठी महिलांना आरोग्य उपकेंद्राची मागणी केली. तसेच विजेची समस्या आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पर्यावरण मंत्री श्री.  ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

महादरवाजा मेट येथे दोन हजार लीटर पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा करून दर्शन घेतले.


Back to top button
Don`t copy text!