
दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । अहमदनगर । देशाची अर्थव्यवस्था उभारी देण्याचे महत्त्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते. त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्यच असते. त्यामुळे नगर शहराचा औद्योगिक विकासासाठी येथील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करु. सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित पुढाकार घेऊन पाठपुरावा करु, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अहमदनगर एमआयडीसीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज तसेच आमी संघटनेचे लघु व मोठ्या उद्योजकांसोबत येथील प्रश्नांसंदर्भात आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, किरण काळे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, मच्छिंद्र साळुंखे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी महसूलमंत्री श्री. थोरात यांच्यासमोर मांडल्या. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा असून एकाच वेळेला दुहेरी कर आकारला जातो, पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्याने ती सतत फुटते. नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज, एमआयडीसी परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल मंजूर करण्याची मागणी आदींबाबत उद्योजकांनी श्री. थोरात यांना माहिती दिली.
औद्योगिकरण होत असताना उद्योग अधिक चांगल्या प्रकारे चालावे यासाठी त्यांना योग्य वातावरण देणे आवश्यक आहे. उद्योजकांनी केलेल्या काही मागण्या या राज्य स्तरावरील आहेत. त्यामुळे याबाबत निश्चितपणे राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल. स्थानिक उद्योजक, येथील संघटना यांना सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करु. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी ज्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्या मार्गी लावू, असे श्री. थोरात यांनी स्पष्ट केले.