….. या वेबसाईटवर उपलब्ध होणार कुणबी जातीचा उल्लेख असलेले अभिलेखे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 23 नोव्हेंबर 2023 | सातारा | सातारा जिल्ह्यातील संबंधित विभागांकडून प्राप्त होणारे 1967 पूर्वीचे कुणबी जातीचा उल्लेख असलेले अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://www.satara.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक मआसु २०२३/प्र.क्र.०३/१६- दि. 7 सप्टेंबर २०२३ अन्वये, मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख, कुणबी असा असेल तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करणेसाठी मा. न्यायमुर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करुन अहवाल शासनास सादर करण्यासाठी न्यायमूर्ती संदिप शिंदे (निवृत्त) समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

महसूल मंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते दस्तऐवज आणि पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांनी कुणबी जातीचे दाखले देण्याबाबत प्रक्रीया सुलभ करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.

शासन स्तरावरुन शासकीय विभाग निहाय १९६७ पूर्वीचे कुणबी जातीचे खालील नमूद केलेले अभिलेख तपासणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये

1. महसुली अभिलेखे – खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरीकांचे राष्ट्रीय रजिस्टरे सन १९५१, नमुना नं.०१ हक्क नोंद पत्रक, नमुना क्र.02 हक्क नोंद पत्रक,  7/12 उतारा.

2. जन्म मृत्यू नोंदी- जन्म मृत्यू नोंदवही (गाव क्रमांक १४),

3. शैक्षणिक अभिलेखे- प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर,

4. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क – अनुज्ञप्ती नोंदवहया, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना,

5. कारागृह अधिक्षक- Register of under trial prisoners, Register showing the description etc of convictedprisoners. 6. पोलीस विभाग- गाववारी,  गोपनिय रजिस्टर सी 1, सी 2,  क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे, FIR  रजिस्टर,

6 अ.- रेल्वे पोलीस विभाग- गुन्ह्याबाबतच्या नोंदी.

7. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी- खरेदीखत नोंदणी केलेले रजिस्टर, डे-बुक, करार खत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्र, बटाई पत्र, दत्तक विधान, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र, इतर दस्त,

8. भूमी अभिलेख विभाग- पक्काबुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हीजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणी पत्रक, नमुना-33 (प्रतिकडील खानेसुमारी) नमुना- 34, टिपण बुक,

9. जिल्हा सैनिक अधिकारी- माजी सैनिक निवृत्तीनंतर नोंदणीकरिता करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार.

10. जिल्हा वक्‌फ अधिकारी- मुंतखब,

11. सन 1967 पुर्वीचे अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा पुस्तक/सेवा अभिलेखे- सेवा पुस्तक/सेवा अभिलेखे.

12. महानगरपालिका/नगरपालिका- शेतवार तक्ता वसूल व आमदनी (assessment rejister)

सातारा जिल्ह्यातील संबंधित विभागांकडून प्राप्त होणारे 1967 पूर्वीचे कुणबी जातीचा उल्लेख असलेले उपरोक्त नमूद अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://www.satara.gov.in  या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!