जिल्ह्यातील बाजार समितीचे फलटणमध्ये कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 23 नोव्हेंबर 2023 | फलटण | महाराष्ट्र राज्य कृषि मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे (NIPHT) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी फलटण येथील हॉटेल जॅक्सन इन येथे सातारा जिल्ह्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांची पणनविषयक कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन पणन संचालनालयाचे उपसंचालक अविनाश देशमुख यांच्या शुभहस्ते बाजार समित्यांचे सभापती यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.

यावेळी उपनिबंधक संदीपकुमार जाधव, उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था फलटण पांडुरंग रोकडे सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांच्यासह विविध मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष घुले यांनी पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे संकल्पनेतून राज्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सदर कार्यशाळेच्या निमित्ताने  पणन संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके यांची पुस्तिका तयार करण्यात आलेली असून ती पुस्तिका बाजार समित्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सचिवांना बाजार समितीचे कामकाज करताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

सदर कार्यशाळेत कृषि पणन कायदा व त्यामधील महत्त्वाच्या सुधारणा याबाबत उपसंचालक अविनाश देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बाजार समितीचे अधिकार व कर्तव्य याबाबत उपनिबंधक संदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले.

केंद्र शासनाच्या कृषि पणन विषयक असणाऱ्या विविध योजनासंबंधी उप कृषी पणन सल्लागार मुंबई ऋग्वेंद्र मुरगोड यांनी मार्गदर्शन केले.

शेतमालाची निर्यात व कृषि पणन मंडळाचे योगदान याबाबत निर्यात व्यवस्थापक सतीश वराडे यांनी मार्गदर्शन केले तसेच बाजार समित्यांसाठी असणाऱ्या पणन मंडळाच्या विविध संगणक प्रणाली यासंदर्भात व्यवस्थापक संगणक कैलास फटांगरे यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती, उपसभापती व समिती सदस्य व सचिव उपस्थित होते.

यावेळी बाजार समितीच्या रँकिंगमध्ये कोल्हापूर विभागातून प्रथम क्रमांक आलेल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर आणि दुसरा क्रमांक आलेबद्दल लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके यांचे व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ आणि सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रसाद भुजबळ यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!