“नाईकबोमवाडीत एमआयडीसी होऊ नये म्हणून रामराजेंचे प्रयत्न; हे खोटे ठरल्यास चौकात फाशी घेईन!” माजी खा. रणजितदादांचा घणाघात; जे काम ते ‘आठवे आश्चर्य’ म्हणतात, ते आम्ही १००% करून दाखवतोच!

नाईकबोमवाडीत एमआयडीसी होऊ नये म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाणीवपूर्वक विरोध केला. हा आरोप खोटा ठरल्यास फाशी घेईन, असे लक्षवेधी विधान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी फलटण दत्तक घेतले आहे.

स्थैर्य, नाईकबोमवाडी, दि. ६ सप्टेंबर : “फक्त नावामध्ये राम असून चालत नाही, तर मनात सुद्धा राम असणे आवश्यक आहे,” असा सणसणीत टोला लगावत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील नाईकबोमवाडी येथे धोम-बलकवडी कॅनॉलच्या बंदिस्त नलिकेचे भूमिपूजन रणजितदादांच्या हस्ते पार पडले, यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

एमआयडीसीला रामराजेंचा विरोध; खोटे ठरल्यास चौकात फाशी घेईन!

नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीच्या मुद्द्यावरून रामराजेंवर थेट प्रहार करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “नाईकबोमवाडी येथे एमआयडीसी होऊ नये म्हणून श्रीमंत रामराजे यांनी शासनामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि एमआयडीसी होऊ नये म्हणूनच त्यांनी बैठका घेतल्या होत्या. जर माझी ही गोष्ट खोटी असेल, तर मी चौकात फाशी घ्यायला सुद्धा तयार आहे.”

विकासकामांवरून विरोधकांना उघडे पाडताना ते पुढे म्हणाले, “श्रीमंत रामराजे ज्या ज्या गोष्टी ‘होणार नाहीत’ किंवा हे ‘आठवे आश्चर्य’ ठरेल असे म्हणून आपल्या विकासकामांना हिणवतात, त्या सर्व गोष्टी १००% पूर्ण होतातच, हा आपला आणि या तालुक्याचा इतिहास आहे.”

मतभेद विसरून तालुक्याचा विकास; मुख्यमंत्र्यांनी फलटण घेतले दत्तक

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आता सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्वांना एकत्रित केल्याचे रणजितदादांनी स्पष्ट केले. “आज मंचावर असे अनेक मान्यवर आहेत जे लोकसभा निवडणुकीपूर्वी माझ्यासोबत नव्हते. अगदी ज्यांनी माझे पुतळे जाळले होते, तेसुद्धा आज आपल्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कामकाज करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांनी विकासासाठी फलटण तालुका जणू दत्तकच घेतला आहे. त्यामुळे फलटणच्या कोणत्याही विकासकामाला निधी कमी पडत नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्यांनी मते दिली नाहीत, तिथेही विकासकामे: आ. सचिन पाटील

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सचिन पाटील यांनी रणजितदादांच्या विकासभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “ज्या गावांनी किंवा वस्त्यांनी आपल्याला कधीही मतदान दिलेले नाही, त्या ठिकाणी सुद्धा कामे करण्याचे स्पष्ट निर्देश रणजितदादांनी आम्हाला दिले आहेत. निवडणुकीच्या वेळी निवडणूक आणि इतर वेळी केवळ विकासकामे करणे, हाच दादांचा उद्देश आहे.”

रस्त्यांच्या कामाबाबत बोलताना ते म्हणाले की, “यापूर्वी तालुक्यात साधे रस्तेही नव्हते, आता चारी दिशांना उत्तम रस्ते आहेत. एकमेव राहिलेला पाडेगाव ते शिंगणापूर हा सिमेंटचा रस्ता सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार मंजूर झाला असून, येणाऱ्या काही महिन्यांत त्याचे काम सुरू झालेले आपल्याला दिसेल.”

याप्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी आपल्या मनोगतातून रणजितदादांच्या धडाडीच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत नाईकबोमवाडीचे युवा नेते यशवंत कारंडे यांनी व्यक्त केले. या सभेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!