फलटणच्या राम मंदिरात स्तोत्र पठण; महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रम ठरला लक्षवेधक

फलटण येथे अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे आयोजित स्तोत्र पठण व गोपाळकाला कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

स्थैर्य, फलटण, दि. ०६ सप्टेंबर : श्रीराम मंदिर येथे आयोजित मारुती स्तोत्र, रामरक्षा, विष्णूसहस्त्रनाम आणि गीतेच्या १५ व्या अध्यायाच्या पठण कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

हजारो तुळशीपत्रे अर्पण अन् दहीहंडीचा उत्साह

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आशिष व अल्पना गडकरी यांच्या हस्ते स्तोत्र पठण सुरू असताना निरंजन क्षीरसागर गुरुजींच्या मंत्रघोषात गोपाल कृष्णाच्या मूर्तीवर १००० तुळशीपत्रे अर्पण करण्यात आली. त्यानंतर ध्रुव देशपांडे या बालगोपालाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.

विविध धार्मिक विधी आणि महाप्रसाद

कार्यक्रमात महिलांच्या हस्ते गोपाळकाल्याचे साहित्य एकत्र करून प्रसाद तयार करण्यात आला. तसेच हॉटेल सेलिब्रेशनतर्फे भाविकांना शिरा प्रसादाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर दाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर पुष्पाताई कदम, अनिता जोशी, वंदना जोशी, शिवानी चिटणीस यांनी मंत्रपठण केले. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

Back to top button
Don`t copy text!