MPSC परीक्षेच्या पद्धतीत मोठे बदल होणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

MPSC परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०६ सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

उच्चस्तरीय समितीची रचना आणि कार्य

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य, पोलीस महासंचालक, आयआयटीचे प्राध्यापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती राज्यातील विविध विभागांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधून परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व सुधारणांबाबत सूचना जाणून घेणार आहे. पुण्यातही विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून प्रत्यक्ष परीक्षा घेण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत बदल करण्यावर सरकारचा भर असून पारदर्शकता आणि गोपनीयता राखण्याच्या मागण्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!