
स्पर्धा परीक्षा पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०६ सप्टेंबर : राज्यातील सरकारी भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती १२ सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी आणि परीक्षार्थींशी थेट चर्चा करून परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व सुधारणांबाबत सूचना जाणून घेणार आहे.
प्रश्नपत्रिकेपासून निकालापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा
परीक्षांमधील गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटणे आणि तोतया उमेदवारांचे प्रकार रोखण्यासाठी ही समिती संपूर्ण परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेणार आहे. प्रश्नपत्रिकांचे मुद्रण, डिजिटल वितरण, गोपनीयता, परीक्षा केंद्र व्यवस्थापन आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या टप्प्यांची तपासणी केली जाईल. तसेच डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि सीसीटीव्ही देखरेख अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना निवेदने देण्यासाठी विशेष कक्ष
केवळ शासकीय पातळीवर नव्हे, तर विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासिका चालक आणि पालकांशी संवाद साधून सूचना गोळा केल्या जाणार आहेत. यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ७ ते १० सप्टेंबरदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. ई-मेलद्वारेही सूचना पाठवता येणार असून या सर्व अभिप्रायांच्या आधारे समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.