MPSC परीक्षार्थींसाठी मोठा निर्णय; मुलाखतीसाठी बार्टीकडून मिळणार १० हजारांची मदत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी बार्टीकडून १० हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि.०६ सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मुलाखतीची तयारी करताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण भासू नये म्हणून ही मदत थेट दिली जाणार आहे.

अर्जाची प्रक्रिया आणि अंतिम मुदत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ११ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्टीच्या पुणे कार्यालयात पोस्ट किंवा कुरियरने पोहोचणे आवश्यक आहे.

पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले, अनुसूचित जाती प्रवर्गातील आणि २५ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले ३५ वर्षांपर्यंतचे उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि बँक पासबुकची प्रत जोडणे गरजेचे आहे. केवळ एकाच पद्धतीने केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!