फलटणच्या शिक्षकांना आमदार सचिन पाटील यांचा स्पष्ट संदेश; राजकारणात काम करणे आता खपवून घेणार नाही

प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी व शिक्षक दिनानिमित्त फलटणमध्ये शैक्षणिक प्रबोधन मेळावा झाला. शिक्षकांची भूमिका आणि शिक्षणातील बदलांवर मंथन झाले.

स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी आणि शिक्षक दिनानिमित्त फलटण नगरपरिषदेच्या वतीने ‘शैक्षणिक प्रबोधन मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला. शिक्षणातील बदल शिक्षकांनी आत्मसात करून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर भर द्यावा, असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले. पहिल्या सत्रात एमकेसीएलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

शिक्षकांनी बदलत्या शिक्षणासोबत स्वतःही शिकावे

आमदार सचिन पाटील म्हणाले की, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाला तोड नव्हती. त्यांचा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा गाढा अभ्यास होता. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, तर एक पिढी घडवण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया आणि त्यांच्यावर होणारे संस्कार चांगले असतील, तरच पुढची पिढी चांगली घडू शकते.

शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल शिक्षकांनीही शिकणे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना घडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी २० महिन्यांपासून आमदार असून वेळोवेळी शिक्षण विभागाचा आढावा घेत असतो. यापूर्वी फलटणला शिक्षकांना शिकवणे सोडून राजकारणात काम करावे लागत होते. आता ते खपवून घेतले जाणार नाही,” असे पाटील यांनी सांगितले.

नगरपरिषद शाळांचा पट पुन्हा वाढत असल्याचा दावा

खासगी संस्थांच्या तुलनेत जिल्हा परिषदेतील शिक्षक गुणवत्तेच्या दृष्टीने चांगले असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. दिलीपसिंह भोसले नगराध्यक्ष असताना नगरपरिषद शाळांचा पट मोठा होता. गेल्या काही वर्षांत तो २५० च्या खाली गेला होता; मात्र आता पुन्हा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

फलटणमध्ये अत्याधुनिक वाचनालयाची अपेक्षा

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रास्ताविकात फलटण शहर आणि तालुक्यात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून रस्ते, सभामंडप आणि इतर विकासकामे होत असून आता शिक्षण क्षेत्रातही भरीव काम करून कायापालट करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या नावाने पुढील वर्षापर्यंत फलटणमध्ये अत्याधुनिक व राज्यासाठी आदर्श ठरेल असे वाचनालय उभारावे, अशी अपेक्षा बेडकिहाळ यांनी व्यक्त केली. या संकल्पनेसाठी दिलीपसिंह भोसले यांनी पुढाकार घेतल्याचे सांगत वाचनालयासाठी आपणही योगदान देऊ, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षक समाजाचा आरसा : सौ. प्रियदर्शनी भोसले

उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी फलटण नगरपरिषदेच्या शैक्षणिक प्रबोधन मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हा समाजाचा आरसा असून त्यांच्यावर पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी असल्याने शिक्षकांसाठी अशा दर्जेदार व्याख्यानांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. फलटणच्या सांस्कृतिक चळवळीत दिलीपसिंह भोसले आणि रवींद्र बेडकिहाळ यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेळाव्यास आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी उपस्थित होते. 

Back to top button
Don`t copy text!