जिल्हा रुग्णालयात राडा, दहा जणांवर गुन्हा 


 

स्थैर्य, सातारा, दि.९: जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्र. 9 मध्ये उपचार घेणार्‍या एका जखमीला जमावाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तत्पूर्वी या युवकास चिंचणेर निंब येथेही डोक्यात दगड मारून जखमी केले असल्याने तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. अनिल उमाकांत जाधव, सुधीर शिवाजी जाधव, गणेश विलास जाधव, शरद विलास जाधव, सुशांत उमेश जाधव, प्रशांत रमेश जाधव, जयंत अशोक जाधव,केदार सुरेंद्र जाधव, उदय उमाकांत जाधव आणि सुनील चंद्रकांत जाधव अशी संशयीतांची नावे आहेत.

याबाबत फिर्यादी मानसिंग दामोदर जाधव वय 25 रा. चिंचणेर निंब, ता. सातारा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते रानातील काम संपवून दुचाकीने घरी येत होते. यावेळी उदय उमाकांत जाधव हा युवक त्यांच्या मागून दुचाकीवरून आला. तो रागाने बघत असल्याने मानसिंग जाधव यांनी रागाने का पाहतो असे विचारले. याचा राग येवून उदय उमाकांत जाधवने त्यांस गाडीवरून खाली ओढले व दगडाने मारहाण करून जखमी केले. जखमी मानसिंग यांस जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथेही जमावाने रुग्णालयात राडा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पो. ना. जाधव करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!