
स्थैर्य, मुंबई, दि. २५: देशावर जेव्हा संकटे आली, त्या-त्या वेळी संघानेच पुढाकार घेऊन याचा मुकाबला करुन देशाला संकटातून बाहेर काढले. कोरोनाच्या संकटातही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कोविड योद्ध्यांसोबत जीव पणाला लावून काम करत आहेत. तरीही गृहमंत्री संघावर टीका करत आहेत. संघ राष्ट्रद्रोही संघटना आहे का, असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारला.
क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी पुण्यातील नागरिकांच्या RTPCR आणि रॅपिड अॅंटीजेन चाचण्या करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. त्या व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्यात मा. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, रा. स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे, पुणे मनपा सभागृह नेते गणेश बीडकर, पुणे शहर भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, प्रतिक देसरडा, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा संघच पुढे आला. संकटसमयी संघच नेहमी धावून येतो. कोविडच्या काळातही अन्नधान्य वाटप, गोर-गरीब कुटुंबांना भोजन व्यवस्था, कोविड बाधितांसाठी केअर सेंटर सुरू करणे, एवढेच नाही; तर अंत्यविधीसाठी देखील संघ स्वयंसेवक पुढे येऊन काम करत आहेत. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मध्यंतरी म्हणाले होते की, पोलीस सेवेतील संघ स्वयंसेवकांना आम्ही शोधून काढू. संघ काही दहशतवादी संघटना आहे का ?
ते पुढे म्हणाले की, कोविडच्या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. हरभजनसिंह, सुधीर मेहता हे त्यापैकी एक आहेत. या दानशूर व्यक्तींनी कोविडच्या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी जो आर्थिक डोंगर उचलावा लागणार आहे, तो उचलण्याची ठरवलं आहे. त्यामुळे आपला देश नक्की या संकटातून बाहेर पडेल.
पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, पुणे शहर कोरोना मुक्त करण्याचा भाजपाचा निर्धार असून, यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि रा. स्व. संघाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या हातात हात घालून काम करत आहेत. यासाठी कोविड टेस्टिंगची ही व्हॅन अतिशय महत्त्वाचे आहे.
क्रिकेटपटू हरभजनसिंह म्हणाले की, महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायचं असून, याचे कर्णधार म्हणून मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील मॅच जिंकू.
लोकार्पण झालेल्या व्हॅनच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचण्या 500 रुपयात आणि रॅपिड अॅंटीजेन चाचण्या 250 रुपयात करण्यात येणार आहेत. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील व्यक्तींची मोफत टेस्ट करण्यात येणार आहे. दररोज दीड हजार आरटीपीसीआर आणि सहा हजार अँटिजेन टेस्ट या लॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.