दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या इतर मागास प्रवर्ग आरक्षण सोडत प्रक्रियेत गुरुवारी अठरा प्रभागांमधून तेरा ओबीसी जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे काही प्रभागात माजी नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या असून काहींना पुढील काळात थांबून वेगळे पर्याय द्यावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. ओबीसी महिला आरक्षणाचे साताऱ्याच्या राजकारणावर पडसाद उमटणार असून राजकीय आखाड्यातील आघाड्यांना सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे.
येथील शाहू कलामंदिर मध्ये सातारा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रांत मीनाज मुल्ला, सातारा पालिकेचे प्रशासक अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे, पालिकेच्या निवडणूक शाखेचे विश्वास गोसावी, एकनाथ गवारी, सभा अधीक्षक अतुल दिसले, हेमंत अष्टेकर इत्यादी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता महिला ओबीसी प्रवर्गाची सोडत काढण्यात आली.
सर्वप्रथम प्रशासन अभिजित बापट यांनी मागास प्रवर्गची सात प्रभागांचीची सोडत झाली त्याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये 1, 2, 3, 4, 8, 13, 15 हे प्रभाग अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्यानंतर तेरा महिला ओबीसी जागांसाठी प्रभागाच्या 18 प्रभागाच्या चिठ्ठ्या सोडतीच्या ड्रममध्ये टाकण्यात आल्या . ही प्रक्रिया पारदर्शी होते की नाही याकरिता सातारा विकास आघाडीच्या वतीने बाळासाहेब ढेकणे व नगर विकास आघाडीच्या वतीने शेखर मोरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
शाळा क्रमांक सातचे विद्यार्थी साक्षी पिंपळे, अरमान पालकर, अमायका शेख, खुशबू साहू, ऋषिकेश पवार यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 या अठरा प्रभागातून निर्देशाप्रमाणे तेरा ओबीसी जागा निश्चित करण्यात आल्या. या ओबीसी आरक्षण सोडतीमध्ये 21, 18, 10, 16, 11, 22, 5 या सात जागा महिला इतर मागास प्रवर्गासाठी निश्चित झाल्या तर 12, 25, 19, 24, 20 आणि 6 या सहा जागा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी निश्चित करण्यात आल्या. तर प्रभाग क्रमांक 7, 23, 9, 17, 14 हे पाच प्रभाग खुल्या गटासाठी निश्चित झाले आहेत. प्रशासक अभिजित बापट यांनी या संपूर्ण आरक्षण प्रक्रियेची उपस्थितांना माहिती दिली.
अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग क्रमांक एकमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले आहे व एक अ ही जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली आहे. एकूण सदस्य संख्या 50 असल्याने सदस्यांच्या 27 टक्के याप्रमाणे आरक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पन्नास सदस्यांच्या 27 टक्के म्हणजे ओबीसीसाठी तेरा जागा द्याव्या लागणार होत्या. सात ओबीसी जागा महिलांसाठी व सहा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. या आरक्षण सोडत प्रक्रियेमध्ये राजकीय समीकरणांची उलटफेर पाहायला मिळाली. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे बऱ्याच दिग्गजांना लगतच्या वार्डाचे पर्याय शोधावे लागतील. काही ठिकाणी आरक्षणामुळे काहीजणांना थांबण्याची वेळ आली आहे.