दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या आरक्षण सोडतीत महत्वाचे गट राखीव झाल्याने अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले. या सोडतीत बावधन, तांबवे, सातारारोड, कोडोली, कोपर्डे- हवेली, नाटोशी, येळगाव, मल्हारपेठ हे गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले. ओबीसी आरक्षणाने अनेकांना मिनी मंत्रालयावर जाण्यासाठीचे दरवाजे खुले केले. शिरवळ, वाठार स्टेशन, देगाव, नागठाणे, औंध, वाठार किरोली, बिदाल, एकंबे, लिंब, म्हावशी, पाल, भुईंज हे दिग्गज नेत्यांचे गट महिलांसाठी राखीव झाले. फलटण, माण व महाबळेश्वर तालुक्यात एकही गट आरक्षित झाला नाही.
जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात झाली. ११ वाजता होणारी ही सोडत एक तास उशीरा सुरु झाली. त्यामुळे उपस्थित लोकप्रतिनिधी व नागरीकांना तासभर तिस्टत बसावे लागले. सुरवातीला उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा याची माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आठ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने गटांची मांडणी करुन २००२, २००७, २०१२, २०१७ मध्ये राखीव झालेले गट वगळून उर्वरित गटातून आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार कोपर्डे हवेली, बावधन, तांबवे, मल्हापेठ, सातारारोड, कोडोली, येळगाव, नाटोशी हे आठ गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. त्यानंतर कोपर्डे हवेली, नाटोशी, येळगाव, मल्हारपेठ हे चार गट महिलांसाठी राखीव असल्याचे चिठ्ठीतून निघाले.
अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी वाई तालुक्यातील केंजळ गावाचा नंबर लागला. इतर मागास प्रवर्गाचे १९ जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले. त्यासाठी २००२ ते २०१७ या कालावधीत ओबीसी आरक्षण पडलेले गट वगळण्यात आले. त्यानुसार थेट आरक्षण लागू होणाऱ्या सहा गटांचा समावेश झाला. त्यामध्ये खेड, उंब्रज, रेठरे बुद्रुक, चरेगाव, कुडाळ, सिद्धेश्वर कुरोली हे गट राखीव झाले.
२००२ पूर्वी राखीव झालेले पण त्यानंतर कधीच राखीव झाले नसलेले आठ गट काढण्यात आले. यामध्ये भादे, पिंपोडे बुद्रुक, कोंडवे, गोकुळ तर्फ हेळवाक, मंद्रुळ कोळे, विंग, सैदापूर, वडगाव हवेली हे गट ओबीसींसाठी राखीव झाले. २००७ मध्ये आरक्षित असलेल्या १५ गटांपैकी पाच गट शोधण्यात आले. या १५ गटातून चिठ्ठीव्दारे पाच गट शोधण्यात आले. यामध्ये कुसुंबी, खेड बुद्रुक, पाडळी, ओझर्डे, कारी हे पाच गट ओबीसीसाठी आरक्षित झाले.
इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी दहा गटांचे आरक्षण काढण्यात आले. चिठ्ठीतून भादे, चरेगाव, खेड, विंग, वडगाव हवेली, कुसुंबी, सिद्धेश्वर कुरोली, कारी, गोकुळ तर्फ हेळवाक, मंद्रुळ कोळे हे दहा गट महिलांसाठी राखीव झाले. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी एकुण ४५ गट होते. त्यातून महिला राखीवसाठी २३ गटांची चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये शिरवळ, कोळकी, वाठार निंबाकर, वाठार स्टेशन, तळदेव, भिलार, म्हसवे, पाटखळ, देगाव, नागठाणे, धामणी, वारुंजी, कार्वे, काले या गटांचा समावेश झाला.
त्यानंतर २००२ मध्ये महिला राखीव असलेले पाच गट पुन्हा २०२२ मध्ये राखीव करण्यात आले. यामध्ये आंधळी, औंध, वाठार किरोली, बिदाल, एकंबे तसेच २००७ मध्ये महिलांसाठी राखीव असलेले तीन गट पुन्हा राखीव करण्यात आले. त्यामध्ये लिंब, म्हावशी, पाल या गटांचा समावेश झाला. पण महिला राखीवची संख्या २३ होणे गरजेचे होते, ती २२ झाल्याने एक गट चिठ्ठीव्दारे काढण्यासाठी २०१२ मध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या खेड बुद्रुक, मसुर, तरडगांव, अपशिंगे, खटाव, निमसोड, मायणी, भुईंज या नऊ गटातून एक चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये भुईंज गटाची चिठ्ठी निघाली. उर्वरिरत २२ गट हे खुल्या प्रवर्गासाठी राहिले आहेत.