फलटण: लवकरच उभारणार अतिरिक्त MIDC; एकनाथ शिंदेचा शब्द म्हणजे ‘काळ्या दगडावरची भगवी रेष’ – उद्योगमंत्री उदय सामंत


फलटणमध्ये अतिरिक्त एमआयडीसी उभारण्याची रामराजे नाईक निंबाळकर यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. तसेच, शिवसेनेत बूथ अध्यक्षांना पूर्ण ताकद आणि संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

स्थैर्य, फलटण, दि. २७ मे : फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त एमआयडीसी (MIDC) उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही एमआयडीसी सुरू करण्याचे आदेश दिले असून, ‘एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे’, त्यामुळे हे काम पूर्ण होणारच, असा ठाम विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.

फलटण येथील शिवसेनेच्या पदाधिकारी आढावा बैठक व सत्कार समारंभात ते बोलत होते.

जागतिक दर्जाच्या कंपनीला राज्याचे पाठबळ

फलटणमध्ये सध्या जगातील तीन नंबरची पोटॅशियम बनवणारी कंपनी कार्यरत आहे. उद्योगमंत्री सामंत यांनी या प्रकल्पाबाबत बोलताना स्पष्ट केले की, या जागतिक दर्जाच्या कंपनीला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी एमआयडीसीमध्ये या कंपनीला विस्तारासाठी जागा लागल्यास ती प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हाध्यक्षांनी ‘आनंद दिघें’सारखा दरारा ठेवावा

सध्या फलटणमध्ये बूथ लेव्हल ऑफिसरचे कामकाज अतिशय उत्तम प्रकारे सुरू असल्याचे सांगत मंत्री सामंत यांनी स्थानिक शिवसैनिकांचे कौतुक केले. शिवसेना पक्ष संघटनेची ताकद सांगताना ते म्हणाले की, “शिवसेनेचे पदाधिकारी हे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही हक्काने आदेश देऊ शकतात.”

तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमदार व मंत्र्यांच्या गाडीचे दरवाजे उघडण्याचे काम करू नये. धर्मवीर आनंद दिघे आणि स्वतः ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राहिलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आपला दरारा आणि नेतृत्व निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुनावले.

बूथ अध्यक्षांना ताकद व संरक्षण

पक्ष संघटनेत तळागाळातील कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट करत, “बूथ अध्यक्षाला शिवसेनेची पूर्ण ताकद आणि संरक्षण दिले जाईल,” असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी उपस्थितांना दिली.


Back to top button
Don`t copy text!