दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सातारा पालिकेच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्यात आल्या. या जागा आरक्षित झाल्याचा फटका साताऱ्यातील दिग्गजांना बसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अमोल मोहिते, अशोक मोने, किशोर शिंदे, जयेंद्र चव्हाण, विजय काटवटे, सुजाता राजेमहाडिक, सिता हादगे, सुहास राजेशिर्के यांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे. तर आरक्षण सोडतीमुळे रविंद्र ढोणे, वसंत लेवे, राजू गोरे यांना मात्र लॉटरी लागली आहे . काही दिग्गजांना धक्का बसल्याचे दिसत असले तरी उमेदवारी निश्चितीवेळी त्यांचे इतर प्रभागात पुर्नवसन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग क्रं अकरा व तेवीस येथून वसंत लेवे यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती . गुरुवार झालेल्या आरक्षण सोडतीने त्यांना कौल दिला. त्यामुळे दोन्ही प्रभागातून त्यांना संधी आहे . प्रभाग क्रं 11 मध्ये बाबाराजे गटातील अविनाश कदम यांनी तयारी केली आहे. शिवाय संजय लेवे हेही इच्छुक आहेत.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा प्रभाग सात सर्वात मोठा असताना तो खुला झाला. तिथे शेंडे यांना याच गटातून पालिकेत यावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक 14 हा खुला झाल्याने स्मिता घोडके यांना याच गटातून नशीब आजमावावे लागेल. सातारा विकास आघाडीचे मार्गदर्शक अॅड. दत्ता बनकर यांना प्रभाग 16 व 18 या दोन्ही प्रभागात संधी आहे. 16 मध्ये महिला ओबीसी आरक्षण पडल्याने बनकर आपल्या प्रभाव क्षेत्रात ही जागा निवडून आणू शकतात. अठरामध्ये त्यांना मात्र मोठे अग्निदिव्य करावे लागेल. प्रभाग बारामध्ये जयेंद्र चव्हाण, किशोर शिंदे यांच्या राजकीय बांधणीवर पाणी पडले आहे. प्रभाग क्रं वीसमध्ये अमोल मोहिते तर एकवीस मध्ये सुजाता राजेमहाडिक यांना थांबावे लागेल नाही तर श्री ऐवजी सौ आणि सौ ऐवजी श्री हा पर्याय पुढे आणावा लागेल. याच प्रभागात अशोक मोने यांना खुल्या गटातून आखाड्यात यावे लागेल.
प्रभाग क्र 24 मध्ये रविंद्र ढोणे तर 25 मध्ये ओबीसी सर्वसाधारण मुळे राजू गोरे यांच्या मार्ग सेफ झाला आहे. वॉर्ड क्रमांक 22 मध्ये कल्याण राक्षे, विजय काटवटे, दिपाली गोडसे, हर्षल चिकणे, धनंजय जांभळे, बाळासाहेब शिंदे असे अनेक राजकीय पर्याय आघाड्यांच्या माध्यमातून आजमावले जातील. प्रभाग क़मांक 25 मध्ये सुहास राजेशिर्के यांना ब्रेक घ्यावा लागेल अशी चिन्हे आहेत. प्रभाग क्रं ६ मध्ये ज्ञानेश्वर फरांदे यांना व लता पवार यांना मागास प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या आरक्षणाची लॉटरी लागली आहे. मात्र त्यांना पुन्हा राजकीय संधी मिळणार का ? हा कळीचा मुद्दा आहे.