पाटणमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रामुळे पर्यटनासाठी मिळणार चालना – ना. शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण | अजित जगताप |
कोयना धरणामुळे संपूर्ण देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रथमच पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती पोलीस दल उभारणीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे खर्‍या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सातारा जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रथम स्थान मिळवणारे शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे चार वर्षानंतर या दोन्ही प्रशिक्षण केंद्राला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.

याबाबत महसूल विभाग, वित्त विभाग, गृह विभाग यांची चार महिन्यापूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर २७१ कोटी ४१ लाख रुपये निधीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी २३३ कोटी व मनुष्यबळ, वेतन, तांत्रिक बाबी अशा गोष्टींसाठी ही निधीची तरतूद झालेली आहे.

वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये यापूर्वी खंडाळा, नाशिक व सांगली जिल्ह्यातील तुरुची या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. त्यानंतर पाटण तालुक्यात हे पोलीस प्रशिक्षण केंद्र होत असल्याने या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

तसं पाहिलं तर सातारा- सांगली- कोल्हापूर- पुणे व कोकण भागाला जोडणार्‍या पाटण तालुक्यातील कोयनानगर या मध्यवर्ती ठिकाणी विशेषत: वाटोळे या ठिकाणी ३९ हेक्टर क्षेत्रामध्ये जलसंपदा विभागाने ही जागा दिल्यामुळे हे केंद्र उभारण्यात येणार आहे. आता महसूल विभागाच्या ताब्यात ही जमीन आली आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राची ही या ठिकाणी उभारणी होणार आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या वतीने वाटोळे या ठिकाणी जागेची पाहणी सुद्धा केलेली आहे. दहा आठवड्याचा कालावधी प्रशिक्षणासाठी लागणार असून एका बॅचमध्ये ३०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणार आहेत, अशीही माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल उपस्थित होत्या. दरम्यान, सामाजिक व इतर प्रश्नांबाबत रास्ता रोको सारखी आंदोलन होत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले की, कोणतेही आंदोलन करताना त्याला मर्यादा हवी आहे. सामान्य माणसांना त्रास होत आहे. विशेषतः वयस्कर लोक यांचा खोळंबा होत असल्याने अशा आंदोलनाबाबत तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. याबाबत राज्यकर्त्यांना उघड बोलता येत नाही. पण इथून पुढे आता पोलीस अधिकाराचा योग्य वापर करून सामान्य माणसाच्या हितासाठी सुद्धा बळाचा वापर करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, महायुतीच्या माध्यमातून विचारविनिमय करून ‘विनिंग मेरिट’ म्हणजे विजयाची खात्री असणारे उमेदवार दिले जातील. जागेबाबत निश्चित काही सांगता येणार नाही; परंतु सर्वांना मिळून किमान ४५ खासदार निवडून येतील, असे त्यांनी दावा केला आहे.


Back to top button
Don`t copy text!