दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा दि. 20 ते 21 जून दरम्यान फलटण तालुक्यामध्ये विसावणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये सर्वच वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाने बारकाईने नियोजन करावे; असे आदेश साताराचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिलेले आहेत.
फलटण पालखी तळावर पालखी सोहळ्याच्या आढावा घेताना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील विविध विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दुडी म्हणाले की, सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पाच दिवसांसाठी विसावणार आहे. यादरम्यान वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची योग्य ती सोय करावी. यासोबतच पालखीतळावर असणाऱ्या दर्शन रांगा सुद्धा सुटसुटीत कराव्यात. पालखीतळावर कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही; याची काळजी स्थानिक प्रशासनाने घ्यावी.
फलटण येथे पालखी सोहळ्या दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार येथे घडत नसून पालखी सोहळ्यामध्ये शहरासह तालुक्यातील नागरिक हे वारकऱ्यांना नेहमी सहकार्य करीत असतात. पालखी तळावर सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष व्यवस्था नेहमीच करण्यात येते. यावर्षी सुद्धा पालखी सोहळ्याच्या दरम्यान कोणतीही व्यवस्था कमी पडू न देण्याचे निर्देश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.