कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटणची परंपरागत रामरथ यात्रा यावर्षी रद्द


 

     श्रीरामाच्या रथाचे विधीवत पूजन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी मानकरी व नाईक निंबाळकर घराण्यातील मान्यवर.

स्थैर्य, फलटण, दि.१४ : नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सहकार्याने गेली सुमारे २५० वर्षाहुन अधिक काळ प्रतिवर्षी मार्गशीर्ष शु|| प्रतिपदा म्हणजे देवदिवाळी दिवशी लाखोंच्या उपस्थितीत भरणारी येथील श्रीराम रथोत्सव यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी आज परंपरागत पद्धतीने आदल्या दिवशी रथपूजन विधीवत करण्यात आले.

श्रीराम मंदिरासमोरील रथखान्यातून श्रीरामाचा परंपरागत रथ बाहेर काढून त्याची ट्रस्टी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा, आरती करण्यात आली, त्यावेळी सर्व मानकरी व नाईक निंबाळकर घराण्यातील मान्यवर उपस्थित होते.

उद्या मार्गशीर्ष शु|| १ (प्रतिपदा) म्हणजे देवदिवाळी दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेस निघतो तथापी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामरथ यात्रा रद्द करण्यात आली असल्याने रथ नगर प्रदक्षिणेस निघणार नाही मात्र यात्रे दरम्यान असलेल्या विविध पूजा व अन्य विधी परंपरागत पद्धतीने होणार असून त्याचाच एक भाग म्हणून आज रथ पूजन करण्यात आल्याचे ट्रस्टच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

रामरथ यात्रेच्या निमित्ताने प्रतिवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत म्हणजे सुमारे दीड महिना दररोज सायंकाळी श्रीराम मंदिरात रामायणावरील कीर्तन सेवा सुरु असते तर यात्रेच्या कालावधीत ४ दिवस मंदिर परिसरात रात्री ८.३० वाजता अंबारी, शेष, गरुड आणि मारुती ही ४ वहने काढण्यात येतात, ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते मात्र यावर्षी हे सर्व पारंपरिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून केवळ नित्य पूजा सेवा परंपरागत पद्धतीने सुरु राहणार आहेत.

भाविकांना सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तथापी गर्दी टाळण्यासाठी मंदिरात दर्शनास न येता घरातूनच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!