निवडणूक आचारसंहिता असल्याने यात्रा कालावधीत मिरवणूक, कुस्त्या, करमणुकीचे कार्यक्रम आयोजित न करण्याचे फलटण पोलीस प्रशासनाचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणूक आचारसंहीता असल्याने व यात्रा कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फलटण ग्रामीण पोलीस प्रशासनाने यात्रा मिरवणूक, कुस्त्या, करमणुकीचे कार्यक्रम यांचे आयोजन न करण्याचे आवाहन करण्यात आले असून संवेदनशील गावांमध्ये १४४ कलम लागू केले आहे. यात्रा शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.

ग्रामदैवताच्या यात्रा सुरू आहेत; परंतु अनेक गावामध्ये गटतट आहेत. अनेक वर्षांपासून यात्रा कमिटी नियुक्तीची कोणतीही विहीत पद्धत नाही. गावचे ग्रामदैवताचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे कोणतेही ट्रस्ट रजिस्टर नाही. त्यामुळे यात्रेचे आयोजन नेमके कोणी करायचे, यात्रेची वर्गणी कशी गोळा करायची, यावरून मतभेद आहेत. कायदेशीर प्रक्रिया करताना कोणालाही ट्रस्ट असल्याशिवाय वर्गणी घेता येत नाही. अनेक वर्षापासून सदर ठिकाणी कोणतेही वाद निर्माण होत नव्हते. परंपरागत पद्धतीने वर्गणी गोळा केली जायची; परंतु आता लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि ज्या वेळेस लोकांना कायद्याची माहिती होते, त्यावेळेस पोलीस व महसूल प्रशासनाला कायद्याप्रमाणेच काम करावे लागते. परंपरा आणि कायदेशीर मार्ग यामध्ये निवड करायची झाल्यास प्रशासनाला कायदेशीर मार्गाची निवड करावी लागते. ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे यात्रा कमिटीचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे, याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. मग कायदेशीर यात्रा करायच्या असतील तर ट्रस्ट असावे लागते; परंतु याची इतक्या वर्ष सर्व लोक गुण्यागोविंदाने व एकमेकांना मानपान देऊन वागत असल्याने त्याची गरज भासली नव्हती; परंतु आता प्रत्येक देवस्थानचे ट्रस्ट होणे गरजेचे आहे. कायदेशीरपणे बोलायचे झाले तर ट्रस्ट असल्याशिवाय एक पैसाही कुणालाही वर्गणी गोळा करता येत नाही. हाच नियम महापुरूष जयंतीसाठी लागू आहे आणि याच्यातूनच काही गावांमध्ये संघर्ष होत आहे.

पोलीस डिपार्मेंटकडे याप्रकारे वाद आल्यानंतर कायदा सुव्यवस्था पोलिसांना सांभाळायची असल्याने कोणत्याही भांडण तंटा किंवा दोन गटांमध्ये हाणामार्‍या होऊ नये म्हणून प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता १४४ प्रमाणे आदेश काढावा लागतो.

पोलीस प्रशासनाकडून सर्वांना विनंती आहे की, आचारसंहिता सुरू आहे. कोणीही मानपान, वर्गणी, कुस्ती, तमाशा याचे आयोजन करून वाद करू नये. वाद झालेस, त्यास राजकीय किनार मिळाल्यास परस्पर विरोधी गुन्हे दाखल होतात. कोणताही गुन्हा होताना एक फिर्यादी, एक अरोपी व गुन्ह्याचे कारण, हे घटक लागतात. बर्‍याच वेळा गुन्ह्याचे कारण दिवाणी स्वरूपाचे असते, त्यावरून वाद होतो. वाद होणे हे मात्र फौजदारीमध्ये येते, म्हणून पोलिस दिवाणीबाबतीत त्यांचा विषय नसताना मीटिंग घेतात; परंतु नाही ऐकले तर गुन्हा दाखल करणेशिवाय पर्याय नसतो. यात्रा आयोजन हा सुद्धा दिवाणी विषय आहे, पण त्यावरून निर्माण होणारे वाद केवळ गुन्हा नाही तर सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करतात. म्हणजे सर्वसामान्य लोक यात्रेत वाद झाल्यास घाबरून जातात, म्हणून अशा वादात पोलीसांना सक्त कारवाई करावी लागते आणि भांडणारे नंतर कारवाईला सामोरे जाऊन कायम कोर्ट चक्कर व प्रतिबंधक कारवाईच्या प्रक्रियेत पुढील अनेक वर्ष अडकून जातात.

म्हणून सर्वांनी यात्रा गुण्यागोविंदाने साजरे करा, वर्षातून एकत्र येतो तर आदराने एकमेकांची चौकशी करा, वाद उकरून काढू नका. शेवटी यात्रेसारखे विषय पूर्वीपासून समाज आपुलकीने नांदावा म्हणून असतो, वितुष्ट निर्माण होणेच कधीच नसतो आणि याउपरोक्ष जर वाद पोलिस स्टेशनपर्यंत आला तर कायदा आपले काम चोख करणार, असा इशारा फलटण पोलीस प्रशासनाने दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!