उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फलटण येथे महायुतीची प्रचार सांगता सभा


दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२४ | फलटण |
माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त रविवार, दि. ५ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे दुपारी २ वाजता निवडणूक प्रचार सांगता सभा आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होणार असल्याची माहिती विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४३ माढा लोकसभा मतदार संघातील भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमाचा आढावा, प्रचार सांगता सभेचे नियोजन व कार्यकर्त्यांच्या सूचना, अडचणी जाणून घेऊन योग्य उपाययोजना करणे यासाठी हॉटेल निसर्ग, सुरवडी, ता. फलटण येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर समारोप करताना जयकुमार शिंदे यांनी प्रचार सांगता सभेविषयी माहिती दिली.

आपल्या मतदार संघातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याबरोबर येथे विकासाची अनेक कामे केली असल्याने आणि सर्वसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शब्दाला केंद्र व राज्य सरकारमध्ये खूप मोठे वजन आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयामध्ये तर त्यांच्यासाठी एक खास कप्पा निर्माण झाल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी आवर्जून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभाशिर्वाद खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याने आणि मतदार संघातील बहुसंख्य मतदार त्यांच्यावर मनापासून प्रेम करीत असल्याने त्यांच्या विजयासंबंधी खात्री झाली आहे, तथापि आता सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर मनापासून काम करून ‘कमळ’ या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन आ. प्रसाद लाड यांनी यावेळी केले.

यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश लोकसभा निवडणूक प्रमुख कर्जतकर, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, युवा नेते श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, विक्रम भोसले, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष पै. बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते अमोल खराडे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण येथील प्रचार सांगता सभेसाठी संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघातील भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू – भगिनी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहील यासाठी सांगता सभेची माहिती माढा लोकसभा मतदार संघातील सर्व ६ विधानसभा मतदार संघात पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित पदाधिकारी यांच्यावर बैठकीत सोपविण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!