
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने मोकाट प्राणी आणि पक्ष्यांसाठी फलटणमध्ये पाणी कुंडी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांकडून याचे स्वागत होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १९ जून : सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, परिसरात पाणीटंचाईच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत माणसांप्रमाणेच मुक्या आणि मोकाट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यावर मार्ग काढत, आपले दैवत समान असलेल्या गोमाता आणि इतर मोकाट प्राण्यांची तहान भागवण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने उपलब्ध करून दिलेल्या पाण्याच्या कुंड्यांच्या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ:
या अत्यंत स्तुत्य आणि भूतदयेच्या उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ गिरवी नाका येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी भाजपा नेते डॉ. नितीन सावंत, ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक राहुल निंबाळकर, अशोकराव जाधव, रोहित नागटिळे, सुदाम (आप्पा) मांढरे, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा, सौ. रुपाली अमोल सस्ते, युवा नेते श्रीवल्लभ हेंद्रे, नगरसेवक किरण राऊत यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वखर्चाने कुंड्या आणि पक्षांसाठीही दाणा-पाण्याची सोय:
वाढत्या उन्हाळ्याचा आणि पाणीटंचाईचा त्रास मुक्या प्राण्यांना होऊ नये या संवेदनशील भावनेतून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण शहरात ठिकठिकाणी गाई, भटके कुत्रे आणि इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या कुंड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. केवळ मोकाट जनावरांचाच नव्हे, तर आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षांचाही विचार या उपक्रमात करण्यात आला असून, पक्षांसाठीही ठिकठिकाणी पिकांचे दाणे आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याच्या विशेष सूचना माजी खासदारांनी दिल्या आहेत.
पाण्यासाठी टँकर देण्याचे निर्देश व देखभालीची जबाबदारी:
शहरात केवळ कुंड्या ठेवून हा उपक्रम थांबणार नाही, तर त्यामध्ये नियमितपणे मुबलक पाणी उपलब्ध राहावे, यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांना या कुंड्यांमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी तात्काळ टँकर उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तसेच, उपलब्ध करून दिलेल्या या सर्व कुंड्यांची नियमित स्वच्छता राखणे आणि त्यात पाणी भरले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ‘माऊली फाउंडेशन’च्या माध्यमातून नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी स्वीकारली आहे.
उन्हाळ्याच्या या कठीण काळात मुक्या प्राण्यांप्रती व पक्षांप्रती दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि सर्व मान्यवरांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमाचे फलटणकरांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
